ठाणेः महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.
ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या.
महिलांनी साडी नेसली तरी चांगल्या दिसतात. सलवार सूट घातला तरी चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी मंचावर खा. श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच महिलांचे महासंमेलन घेण्यात आले. त्यामुळे महिलांना योगासाठी घातलेले ड्रेस बदलता आले नाही. साड्या नेसायला वेळ नाही मिळाला तरी काही समस्या नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. साडी नेसली तरी महिला चांगल्या दिसतात. महिला सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात. अमृता फडणवीससारख्याही चांगल्या दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले.
अमृता फडणवीसांना तरूण राहण्याचा ध्यासः अमृता फडणवीस यांना तरूण राहण्याची एवढा ध्यास आहे की, मला वाटते अमृता फडणवीस शंभर वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप हिशेबात अन्नग्रहण करतात. खुश राहतात. जेव्हा बघावे तेव्हा लहान मुलासारखे हसत असतात. जसे स्मित हास्य अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसेच स्मित हास्य मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायचे आहे, असेही बाबा रामदेव म्हणाले.
टिकेची झोडः बाबा रामदेव यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यांच्यावर टिकेची झोड उठली. अनेकांनी बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाने बाबा रामदेव यांच्या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करावी, असी मागणीही केली सोशल मीडियावर केली जात आहे.