न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेच्या खरेदी घोटाळ्यातील लेखापालावर कोणाची मेहेरनजर? सहसंचालक कार्यालयात महत्वाची आस्थापना कशी?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेत शासकीय खरेदीचे नियम पायदळी तुडवून  कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हा घोटाळा न्यूजटाऊनने पुराव्यानिशी उघडकीस आणूनही उच्च शिक्षण संचालनालयाने त्यावर कोणतीच कारवाई केली नाही. विशेष म्हणजे या घोटाळ्यात महत्वाची भूमिका बजावणारा लेखापाल भाऊसाहेब गायकवाडवर छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून महत्वाच्या आस्थापनेची जबाबदारी सोपवण्यात आलेली असून तोच या कार्यालयातील एका अधिकाऱ्याला हाताशी धरून हा घोटाळा दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेतील संचालक/प्रभारी संचालकांनी लेखापाल भाऊसाहेब गायकवाड यांच्याशी संगनमत करून स्पर्धात्मक निविदा किंवा दरपत्रके न मागवताच मर्जीतील पुरवठादारांकडून मनमानी पद्धतीने लक्षावधी रुपयांची साधनसामुग्री खरेदी केली.

राज्य सरकारने १ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय जारी करून शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची सुधारित नियम पुस्तिका जारी केली आहे. या शासन निर्णयानुसार खरेदीदार विभागांना ३ लाख रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी दरपत्रके मागवून खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु त्या वस्तूचे एका आर्थिक वर्षात दरपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या खरेदीचे एकूण मूल्य ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, याचे काटेकोरपणे पालन करण्याचा दंडक घालण्यात आला आहे. शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेत खरेदी करत असताना या दंडकाचे काटेकोर पालन होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी लेखापाल भाऊसाहेब गायकवाड यांची होती. परंतु तेच संस्थेचे संचालक/प्रभारी संचालकांना सामील झाल्यामुळे संचालक, खरेदी समिती आणि लेखापाल गायकवाड यांनी या शासन निर्णयाला तिलांजली देऊन एका एका वर्षात तब्बल १५-१५ लाखांच्या साधनसामुग्रीची खरेदी स्पर्धात्मक दरपत्रके किंवा निविदा न मागवताच करून शासकीय तिजोरीवर लाखो रुपयांचा डल्ला मारला आहे.

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेतील हा लक्षावधी रुपायांचा खरेदी घोटाळा न्यूजटाऊनने उघडकीस आणल्यानंतर उच्च शिक्षण संचालनालयाकडून तातडीने कारवाईचे आदेश दिले जातील आणि या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा उच्च शिक्षण क्षेत्राकडून व्यक्त केली जात होती. परंतु या घोटाळ्यात महत्वाची भूमिका निभावणारा लेखापाल भाऊसाहेब गायकवाड हा विभागीय सहसंचालक कार्यालयात महत्वाच्या आस्थापनेवर वरिष्ठ लिपीकपदावर कार्यरत असल्यामुळे या घोटाळा प्रकरणी कारवाई तर दूरच पण अद्याप साधी चौकशी सुद्धा होऊ शकलेली नाही.

विभागीय सहसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याला हाताशी धरून भाऊसाहेब गायकवाड हा या घोटाळ्याची चौकशी होऊच नये, यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे. त्यामुळेच या घोटाळ्याच्या चौकशीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. हा घोटाळा थंड्या बस्त्यात टाकून त्यावर पांघरूण घालण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच भाऊसाहेब गायकवाडचे आणखी काही घोटाळेही न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.

लेखापाल कसा बनला कोट्यधीश?

 न्यूजटाऊनच्या हाती आलेल्या माहितीनुसार शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेतील लेखापाल आणि सध्या विभागीय सहसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब गायकवाड यांनी शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेत घोटाळा करून कोट्यवधी रुपयांची माया कमवली आहे. त्यांचे सव्वा कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या फक्त घराचेच बांधकाम सुरू आहे. कनिष्ठ लिपीक दर्जाचा एक साधा कर्मचारी कोट्यवधींची मालमत्ता कशी काय जमवतो? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आता भाऊसाहेब गायकवाड यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी काही संघटनांकडून केली जाणार असल्याचे समजते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!