व्हॉट्सअपची सेवा तब्बल दोन तासांनंतर पुन्हा सुरू, अस्वस्थ यूजर्सना मोठा दिलासा!


मुंबईः भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजता डाऊन झालेल्या व्हॉट्सअपची सेवा तब्बल दोन तासांनंतर पुन्हा पूर्ववत झाली आहे. भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे लोकांना एकमेकांना मेसेज पाठवता येत नव्हते. त्यामुळे लक्षावधी यूजर्स हैराण झाले होते. अखेर ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने भारतातील यूजर्सनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

 आज मंगळवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज पाठवण्यात काही यूजर्सना अडचणी यायला सुरूवात झाली होती. त्यानंतर काहीवेळाने पर्सनल मेसेजही पाठवता येत नव्हते. त्यामुळे व्हॉट्सअप बंद पडले की काय? अशी विचारणा अनेक यूजर्स फेसबुक आणि ट्विटरवर येऊन करू लागले होते. काही जणांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गंमतीशीर मीम्सही शेअर केले होते.

हेही वाचाः भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण!

 तांत्रिक बिघाड झाल्यामुळे व्हॉट्सअपची सेवा विस्कळित झाल्याचे सांगितले जात असतानाच हा बिघाड झाल्याच्या सुमारे दीड तासांनंतर व्हॉट्सअपची मालक असलेल्या मेटा कंपनीने पहिली प्रतिक्रिया दिली होती.

आम्हाला माहीत आहे की काही यूजर्सना मेसेज पाठवण्यात अडचणी येत आहेत. आम्ही त्यावर काम करत असून लवकरात लवकर ही सेवा सगळ्यांसाठी पुन्हा पूर्ववत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले होते. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने व्हॉट्सअपची सेवा पुन्हा सुरू झाली आहे.

सुमारे दोन तास व्हॉट्सअप डाऊन राहिल्यानंतर मेटा कंपनीने ही सेवा पूर्ववत केली आहे. आता मोबाइलबरोबरच संगणक आणि लॅपटॉपवरही व्हॉट्सअप वेबही कनेक्ट होऊ लागले आहे.

 आज दुपारपासून व्हॉट्सअपवरून मेसेजची देवाणघेवाण करता येत नसल्यामुळे भारतातील लक्षावधी यूजर्स हैराण झाले होते. अनेकांचे कोणतेही मेसेज जात किंवा येत नव्हते. व्हॉट्सअपच्या या तांत्रिक बिघाडाचा सर्वाधिक फटका मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊसारख्या प्रमुख शहरातील यूजर्सना बसला. आता ही सेवा पूर्ववत झाल्यामुळे यूजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!