मुंबईः मान्सूनने रविवारी उर्वरित महाराष्ट्र व्यापल्याचे जाहीर करण्यात आले असून आता मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
जूनचा शेवटचा आठवडा उजाडला तरी महाराष्ट्रात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत तर काही ठिकाणी धुळ पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. आता मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
या आठवड्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसराला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाण आणि पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असे कुलाब्याच्या प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.