मुंबईः गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून हा अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. २१ ऑगस्टपर्यंत राज्याच्या काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उभी पिके करपू लागल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. जुलै महिन्यात हजेरी लावलेला पाऊस पुन्हा गायब झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे.
हवामान विभागाने विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे या पाचही जिल्ह्यात आजपासून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने पूर्व विदर्भाला आधी यलो अलर्ट दिला होता. परंतु हवामानाची परिस्थिती बदलल्यामुळे या भागात आता अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामानाची स्थिती बदलली आहे.
पुणे शहरांसह नजीकच्या भागाला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन-चार तासांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात वायव्य दिशेला ओडिशाच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो वाव्यव्य दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे २१ ऑगस्टपर्यंत विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर राहणार आहे. या काळात विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.