
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. टकले यांनी आपल्या भाषणात सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केल्याच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतन कॉलनीतील रहिवासी आप्पासाहेब बाबासाहेब पारधे यांनी निरंजन टकले यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून निरंजन टकले यांच्या विरोधात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम ३५६ (२) आणि ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानावर २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान १९ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात २३ फेब्रुवारी रोजी पावणे दहा वाजेच्या सुमारास ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे ‘संविधान आणि लोकशाहीला कार्पोरेट मनुवाद्याचे आव्हान’ या विषयावर भाषण आयोजित करण्यात आले होते.
आपल्या भाषणात निरंजन टकले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलतात. हा खोटारडेपणा करण्याची हिम्मत राज्याच्या मुख्यमंत्र्यात येते, याचे कारण हा विद्रोह आणखी रस्तयावर झालेला दिसत नाही आणि आता तो घडवायचा आहे. हा विद्रोह रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत व्हायलाच हवा. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनाने विद्रोह कसा करायचा याचा मार्ग दाखवला आहे, असे म्हणाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘सत्यमेव जयते’ या घोषवाक्यात बदल करून ‘यतो धर्मस्ततो जयः’ असे करण्यात आले आहे, असा दावा करत न्यायव्यवस्थेत मनुवाद आणला जात असल्याचा आरोप निरंजन टकले यांनी केला होता. सत्यमेव जयते हे घोषवाक्य सत्याचाच विजय होणार असे सांगते आणि यांचे नवीन घोषवाक्य सत्याची बाजू कितीही बळकट असली तरी धर्माचाच विजय होणार असे सांगते, असेही टकले म्हणाले होते.
मी मोदींना ऍशहोल म्हणू शकत नाही…
अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य एवढे आहे की, अभिनेता रॉबर्ट डीनीरोसारखा हॉलीवूडचा अभिनेता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुलेआम ‘डोनाल्ड ट्रम्प इज ऍशहोल’ असे म्हणू शकतो. परंतु मला कितीही वाटले तरी मी ‘मोदी इज ऍशहोल’ असे नाही म्हणू शकत. तेवढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येथे नाही. मी जे काही बोलतो, त्याचा अर्थ लोकांना कळतो, असेही निरंजन टकले म्हणाले होते.
निरंजन टकले यांच्या या विधानांमुळे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाबद्दल खोटी माहिती पसरवून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. टकले यांनी आपल्या भाषणात सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केली आहेत, असे पारधे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कय्युम अब्दुल मोहम्मद करत आहेत.

