उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा; कार्यकाळ पूर्ण न करताच पद सोडणारे तिसरे उपराष्ट्रपती,पण…


नवी दिल्लीः देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देत असल्याचे धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने सभागृहाचे कामकाज पाहिले. ऑगस्ट २०२२ मध्ये धनखड हे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले होते, परंतु त्यांनी कार्यकाळ संपण्याच्या आधीच उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे.

 यापूर्वी भारताच्या दोन उपराष्ट्रपतींनी, व्ही.व्ही. गिरी यांनी १९६९ मध्ये तर आर. व्यंकटरमन यांनी १९८७ मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता, परंतु त्यांना भारताचे राष्ट्रपती बनायचे होते म्हणून त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडले होते. धनखड यांनी मात्र प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपद सोडले आहे. धनखड यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार होता.

धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेले राजीनामापत्र उपराष्ट्रपतींच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहे. ‘आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य देणे आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी संविधानाच्या कलम ६७ (अ) अन्वये तत्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देत आहे,’ असे धनखड यांनी या राजीनामापत्रात म्हटले आहे. धनखड यांना यावर्षीच्या मार्च महिन्यात ह्रदयाशी संबंधित समस्या निर्माण झाली होती. परंतु त्यातून ते बरे झाले आहेत आणि तेव्हापासूनच ते आपल्या कार्यक्रमांमध्ये सहभागीही होत असल्याचे सांगितले जात होते.

दिवसभर बातचित, पण लागू दिला नाही सुगावा

सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. सोमवारी राज्यसभेच्या दिवसभराच्या कामकाजापैकी पहिल्या अर्ध्या भागाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. त्यात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावर त्यांनी महत्वाचा हस्तक्षेपही केला होता. धनखड यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत खासदार आणि सभागृहातील नेत्यांशी बातचित केली, परंतु दुपारच्या भोजनानंतरच्या सत्रात ते सभागृहात परतलेच नाहीत.

दुपारी १२.३० वाजता झालेल्या राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. परंतु आपण उपराष्ट्रपतिपद सोडणार असल्याचे कोणतेही संकेत त्यांनी दिले नाही. त्यामुळे धनखड यांचा राजीनामा अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत तरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला की नाही, याबाबत कोणतेही संकेत दिलेले नव्हते.

जाण्यापूर्वी म्हणालेः चर्चा, संवाद आणि विचारविनिमयातच खरी ताकद

तत्पूर्वी सोमवारी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्याबरोबर आपल्या प्रारंभिक भाषणात धनखड यांनी राजकीय पक्षांना परस्परांचा सन्मान राखण्याचे आणि ‘निरंतर कटुता’ टाळण्याचे आवाहन केले होते. एक समृद्ध लोकशाही अथक शत्रुत्वात काम करू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. भारताची ऐतिहासिक ताकद चर्चा, संवाद आणि विचार-विनिमयातच आहे, त्याने संसदेला मार्गदर्शन केले पाहिजे, असेही धनखड म्हणाले होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलले, तेच भोवले?

धनखड यांना जे मुद्दे महत्वाचे वाटायचे, त्यावर ते खुलेपणाने बोलायचे. उपराष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही जे मुद्दे त्यांच्यासाठी महत्वपूर्ण होते, त्यावर ते मोकळेपणाने बोलले. ग्रामीण आणि शेतकरी पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला. डिसेंबर २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला होता.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थित मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांसोबत बातचित सुरू करण्याच्या गरजेवर भर दिला होता. धनखड हे भारतातील अनेक राजकीय पक्षांशी संलग्न राहिलेले आहेत. त्यात भाजप, काँग्रेस आणि जनता दलाचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!