छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आर.बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्या इतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भवितव्य ठरेल, असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले.
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत झाले. यावेळी गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर.बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्मसिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो. या भागातील नागरिक कलेचा सन्मान करणारे आहेत. २० वर्षाचा असताना मी मुंबईला आलो. त्यावेळी मी मराठी नाटके पाहिली. अशी कला मी कधीही पाहिली नव्हती. तेव्हापासून मी महाराष्ट्रात राहत असून दिवसेंदिवस माझे डोळे उघडत गेले. महाराष्ट्रात कलेचा सन्मान केला जातो. विशेषत: साहित्य, कला, कविता, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीताबद्दल या भागातील सामान्य नागरिक विचार करतो, त्याला सन्मानित करतो, ही खूप आशादायी बाब आहे, असे जावेद अख्तर म्हणाले.
समकालीन काळात चित्रपट बनवणाऱ्यापेक्षा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असून कोणत्या प्रकारचे चित्रपट बनतील आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट बनणार नाहीत; याची जबाबदारी लोकांवर आहे. त्याचप्रमाणे आजच्या चित्रपटात मूल्य, नैतिकता आणि कोणत्या प्रकारचे संस्कार असतील हे सामान्य नागरिक ठरवतील असेही गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले.
मी या शहरात पहिल्यांदा आलोय. इथे येऊन मी मनापासून आनंदी आहे. मला चित्रपट महोत्सव आवडतो. सर्वांनी अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आनंदाने साजरा करावा. महोत्सवाची उद्घाटन झाले असे दिग्दर्शक आर. बाल्की म्हणाले.
चित्रपटाला या भागामध्ये गंभीरपणे घेतले जाते. असा हा भाग असून या भागामध्ये एमजीएम फिल्म इन्स्टिट्यूट निर्माण केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. चित्रपट बनविण्यापेक्षा दुसरे कुठले मोठे काम नाही. विशेषत: चित्रपट क्षेत्रामध्ये काम करीत असताना खूप मानसन्मान मिळतो, असे दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले.
संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शहराच्या दृष्टीने असलेले महत्व सांगितले. या भागातील प्रतिभेला एक व्यासपीठ या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. एखाद्या फिल्म इन्स्टिट्यूटचा जन्म अशा महोत्सवातून होणे ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांनी अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामागची भूमिका मांडली. जावेद अख्तर यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ आपल्यासाठी महत्वाची आहे. हा महोत्सव लोकांचा असून ही साहित्यिकांची, सुफी संत आणि सतांची भूमी आहे. आम्हाला धर्मनिरपेक्षता गीतकार जावेद अख्तर यांच्या चित्रपटातुन शिकायला मिळाली. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला हिंदुस्थानियत शिकवली आहे, असे ते म्हणाले.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली जर्मन भाषेतील फिल्म ‘फॉलन लिव्हस’ ही फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित करण्यात आली. हा चित्रपट महोत्सव पुढील चार दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.
जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना यावर्षीचा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक धृ्रतीमान चॅटर्जी, ज्युरी सदस्य म्हणून प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी), भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता इतर गटातील सिनेमा परीक्षक ज्युरी अध्यक्ष एन.मनू चक्रवर्थी (बंगळूरू), श्रीदेवी पी. अरविंद (कोचीन), सचिन चट्टे (पणजी) आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी भावे आणि नीता पानसरे वाळवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत यांनी केले.
आज पहायला मिळतील हे चित्रपट
गुरूवार, दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती खालील प्रमाणे आहे.
१. दुपारी ०२:३० वाजता आयनॉक्स येथे पा, चिनी कम, घुमर, शामीताभ, पॅडमॅन या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आर.बाल्की यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे.
२. सायं ६ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक पद्मश्री जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्यासमवेत संवाद साधतील.
३.चित्रपट: सर्व चित्रपट आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथील स्क्रीन १, स्क्रीन २ आणि स्क्रीन ३ येथे पाहण्यास मिळतील
स्क्रीन १
सकाळी १० वाजता : इट्स रनिंग इन दि हाऊस (बेल्जीयम,फ्रांस/फ्रेंच/२०२३)
सकाळी ११.४५ वाजता – रिमेम्बरिंग एव्हरी नाईट (जपान/जापनीज/२०२२)
दुपारी २ वाजता- फ्रॅग्रंट (इराण/फारसी/२०२३)
दुपारी ४ वाजता- डू नॉट एक्स्पेक्ट टू मच ऑफ दि इंड ऑफ दि वर्ल्ड (फ्रांस/क्रोएशिया/रोमानियन/२०२३)
सायंकाळी ७ वाजता- दि बॅटल (ब्राझील/पोर्तुगीज/२०२३)
रात्री ८.३० वाजता- ब्लागा’स लेसन्स (बल्गेरिया/जर्मनी/बल्जेरियन/२०२३)
स्क्रीन २
सकाळी १०.०० वाजता- नेल्लियर कोथा/दि नेल्लिये स्टोरी (इंडिया/आसामी/२०२३)
दुपारी १२. वाजता- इट्स ऑल इन युवर हेड (इंडिया/इंग्रजी,हिंदी,राजस्थानी/२०२३)
दुपारी १.४५ वाजता- व्हेयर दि रोड लीड्स (सर्बिया/ सर्बेयिन/२०२३)
दुपारी ३.३० वाजता- दि ब्रेकिंग आईस (चीन,सिंगापूर/चायनीज,कोरियन,इंग्रजी/२०२३)
सायंकाळी ५.३० वाजता- दि रेड सूटकेस (नेपाळ,श्रीलंका/नेपाळी/२०२३)
सायंकाळी ७.१५ वाजता- वल्ली (इंडिया/मराठी/२०२३)
स्क्रीन ३
सकाळी १० वाजता- ऑर्फिया इन लव्ह (जर्मनी/जर्मन/२०२२)
दुपारी १२ वाजता- घुमर (इंडिया/हिंदी/२०२३)
दुपारी २.३० वाजता- मगणम (व्हिएतनाम/व्हिएतनामीज/२०२२)
दुपारी ४.१५ वाजता- पाचोळा कादंबरीवर आधारित (इंडिया/मराठी/२०२३)
सायंकाळी ६.१० वाजता- लुसिया (क्युबा/स्पॅनिश/१९६८)
रात्री ९ वाजता- स्टार्ट ओव्हर (रशिया/रशियन/२०२२)
भारतीय सिनेमा स्पर्धा
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.
भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक धृ्रतीमान चॅटर्जी (कोलकाता) हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी) हे मान्यवर असणार आहेत.
फिप्रेसि ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसि भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेसिने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष एन.मनू चक्रवर्थी (बंगळूरू), श्रीदेवी पी. अरविंद (कोचीन), सचिन चट्टे (पणजी) हे मान्यवर या समितीत असणार आहेत.
प्रतिनिधी नोंदणी
चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरूवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ पाचशे पन्नास रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ तीनशे पन्नास रुपयांत या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. प्रतिनिधी नोंदणी सुरुवात झाली असून www.aifilmfest.in या वेबसाईट वर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी साकेत बुक वर्ल्ड (औरंगपुरा), तापडीया आयनॉक्स (सिडको), आयनॉक्स-रिलायन्स मॉल, आयनॉक्स-प्रोझोन मॉल व निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड येथे करता येईल.
संयोजन समिती
छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. अपर्णा कक्कड, आकाश कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे, शिवशंकर फाळके, सुबोध जाधव, नीना निकाळजे, डॉ. कैलास अंभुरे, निखिल भालेराव, अमित पाटील, किशोर निकम, अजय भवलकर, नीता पानसरे, निलीमा जोग आदींनी केले आहे.