
मुंबई: मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात ११७.८ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. अतिवृष्टीमुळे पाथरी आणि हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून मदत आणि बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा दिला आहे.
परभणी जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरू आहे. पाथरी तालुक्यात सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला असून, नदी-नाल्यांना पूर आले आहेत. पाथरी तालुक्यात ११७.८ मिलीमीटर पाऊस झाला. कासापुरीत सर्वाधिक २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे मौजे हदगाव नखाते, येथील सात ते आठ नागरिक पुराच्या पाण्यामुळे घराच्या छतावर अडकून पडले होते. आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. पुरामुळे बाधित नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले असून तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे बरडा येथे तीन व्यक्ती पुराच्या पाण्यामुळे मंदिरात अडकून पडल्या होत्या. माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकामार्फत त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील ५४ पैकी ९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे काही ठिकाणी रस्ते मार्ग बंद झाले आहेत तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा पूर्ण भरल्यामुळे दोन दरवाजे उघडून १७ हजार ६४१ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पावसाची सर्वाधिक जोर पाथरी तालुक्यात होता. पाथरी तालुक्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. हदगावमध्ये १०६ मिमी, कासापुरीमध्ये २१५ मिमी तर बोरी महसूल मंडळात १०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून ते २४ जुलै २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रोजीचे रात्री ८.३० पर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
कोकणासह घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.