छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त नागसेनवन परिसरातील मिलिंद महाविद्यालयाच्या लुम्बिनी उद्यानात नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. २९, ३० आणइ ३१ मार्च असे तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये भरगच्च कार्यक्रमांची मेजवानीच आंबेडकरी अनुयायांना मिळणार आहे. महोत्सवाचे हे ८ वे वर्ष आहे.
आज शुक्रवारी (२९मार्च) सायंकाळी ६.३० वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उदघाटक होईल. त्यानंतर पटकथा लेखक, साहित्यिक तथा पत्रकार संजय पवार यांचे ‘लोकशाही आणि आंबेडकरी समाज’ या विषयावर व्याख्यान होईल. तत्पर्वी उत्कर्षा बोरीकर यांचे भीमगीतावरील स्वागतपर भरत नाट्यमचे सादरीकरण होईल.
शनिवारी (३० मार्च) नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी लुम्बिनी उद्यान येथे सकाळी ११ ते ३ यावेळेस शहरातील तज्ञ्ज डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत सुपरस्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबीर , मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात तपासण्या व चाचण्या करण्यात येणार आहेत.
शनिवारी सायंकाळी ६ ते ७:४५ या वेळेत दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केलेले आईस्काचे नेते डॉ.राहुल सोनपिंपळे, फिन्द्री या बहुचर्चित कादंबरीच्या लेखिका डॉ.सुनीता बोर्डे यांचे व्याख्यान होईल.
सायंकाळी ८ ते १० या वेळेत नागसेनवनातील माजी विद्यार्थी कवींचे संमेलन होईल. त्यात डॉ.उत्तम अंभोरे, प्रा.युवराज धसवाडीकर, प्रा.भास्कर गायकवाड, ऍड.हिरामण मोरे, प्रा.देवानंद पवार, प्रा.एकनाथ खिल्लारे, पद्माकर तामगाडगे, यांचा सहभाग असणार आहे. जेष्ठ कवी डॉ.महेंद्र भवरे हे अध्यक्षस्थानी असतील.
रविवारी (३१ मार्च) महोत्सवाच्या समारोपाला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मिलिंद नागसेनवन आजी-माजी विद्यार्थी संमेलन पार पडणार आहे. त्याअंतर्गत सिडनहॅम कॉलेजचे माजी प्राचार्य व्ही. बी. तायडे, ऍड.जयमंगल धनराज, महेंद्र भवरे, डॉ.युवराज धसवाडीकर, डॉ.प्रियानंद आगळे आदी माजी विद्यार्थी यांच्या परिसंवादातून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासाबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे. पीईएस अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी तथा पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होईल.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यास देण्यात येणारा नागसेन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर याना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
सायंकाळी ८ ते १० वेळेत भीमशाहीर मेघानंद जाधव, डॉ.किशोर वाघ, रॅपर विपीन तातड, मंगेश इंगोले यांच्या भीमगीतांच्या सादरीकरणाने फेस्टिव्हलचा समारोप होईल. ७१ ब्रदर ग्रुपचे भीमगीतांवर नृत्य सादरीकरण होईल.
महोत्सवाच्या तीनही दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांना मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांचे भीमगीतांवरील समूह नृत्य, पेंटिंगचे प्रात्यक्षिक व इतर कला प्रकाराचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती नागसेन फेस्टिव्हल संयोजन समितीच्या वतीने मुख्य निमंत्रक सचिन निकम यांनी दिली.