
मुंबई: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता (घाटी) नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारण्यासाठी ७६५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया राबवून इमारत उभारणी करण्याच्या बांधकामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या उभारणीसंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफ बोलत होते.
निविदा प्रक्रियेसाठी एका महिन्याचा कालावधी असेल आणि त्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात येईल. शासनाने प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल. घाटी रुग्णालयाच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
या वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग, रोबोटिक सर्जरी अशा अनेक उपचार केले जातात म्हणून दरवर्षी २५ हजारहून अधिक बाह्यरुग्ण उपचारासाठी येत असतात. विशेषतः खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागांतील गरीब आणि गरजू रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयाचा विस्तार आणि आधुनिकीकरण होणे अत्यावश्यक असल्याने येत्या काळात नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) नागरिकांसह मराठवाड्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन सुपर स्पेशालिटी विभागामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून गरजू रुग्णांना चांगल्या उपचार आणि सुविधा मिळतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य संजय केनेकर, प्रसाद लाड यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला.
