मुंबई: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या इमाव, विजाभज आणि विमाप्र विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती करण्याची योजना आहे. तांत्रिक अडचणींमुळे सदरचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास महाआयटीकडून विलंब झाला होता. मात्र आता याबाबत तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य सुधाकर अडबाले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी सन २०२१-२२ करिता १४.४४ कोटी व सन २०२२-२३ करिता २१.६० कोटी इतकी तरतूद इतर मागास बहुजन संचालनालय, पुणे यांना वितरीत करण्यात आली असून त्यांच्यामार्फत महाआयटी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आयटीआयमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या इमाव, विजाभज आणि विमाप्र विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती करण्याची ही योजना असल्याने खासगी आयटीआयना अनुदान देण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.