हैदराबादः तेलंगण सरकारने सुधा भारद्वाज, प्रोफेसर हरगोपाल यांच्यासह १५२ जणांविरुद्ध दाखल केलेले बेकायदेशीर कृत्य( प्रतिबंधक) अधिनियमांतर्गतचे (यूएपीए) खटले पुढे न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या पोलिस प्रमुखांना हे खटले ‘वापस’ घेण्याचे निर्देश दिले आहेत.
द हिंदूने या संबंधीचे वृत्त दिले आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्याचे पोलिस प्रमुख (डीजीपी) अंजनीकुमार यांच्याकडे या प्रकरणाबाबत चौकशी केली आणि या प्रकरणात यूएपीएसारखा कठोर कायदा लागू करण्याच्या आवश्यकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच निर्देश दिल्यामुळे तेलंगण पोलिस आता यूएपीए अंतर्गत दाखल केलेले हे खटले मागे घेतले जाऊ शकतात काय, याची पडताळणी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आता हे खटले पुढे चालवले जाणार नाहीत आणि जेव्हा आरोपपत्र दाखल केले जाईल तेव्हा सुधा भारद्वाज, प्रोफेसर हरगोपाल यांच्यासह १५२ जणांच्या नावांचा त्यात उल्लेख केला जाणार नाही, अशी पूर्णतः शक्यता आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
यूएपीएच्या केसेस सहजगत्या मागे घेतल्या जाऊ शकत नाहीत. पोलिसांना न्यायालयाकडे सूचित करण्यासाठी काहीएक ठोस पुरावा मिळाला नाही तर पोलिसांना या केसेस मागे घेण्यासाठीही उचित प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
तेलंगणमधील मुलुगू जिल्ह्यातील तदवई पोलिसांनी प्रोफेसर हरगोपाल आणि अन्य १५१ जणांविरुद्ध ऑगस्ट २०२२ मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यात यूएपीएच्या कलमांचाही समावेश आहे. या आरोपींनी बंदुकीच्या जोरावर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
या प्रकरणात हैदराबाद विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक हरगोपाल यांच्याखेरीज उस्मानिया विद्यापीठातील पत्रकारिता विषयाच्या सेवानिवृत्त प्रोफेसर पद्मजा शॉ, तेलंगण सिव्हिज लिबर्टीज कमेटीचे अध्यक्ष प्रोफेसर गड्डम लक्ष्मण, इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्सचे न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) एच. सुरेश, कार्यकर्ता आणि वकील सुधा भारद्वाज, वकील सुरेंद्र गडलिंग आणि कार्यकर्ता अरूण फरेरा या नामवंत व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे.
पीपल्स डेमॉक्रेटिक मूव्हमेंटचे अध्यक्ष चंद्रमौली यांनी रंगारेड्डी जिल्ह्यातील एलबीनगर न्यायालयात धाव घेतल्यानंतर १५ जून रोजी हे प्रकरण प्रकाश झोतात आले होते.
चंद्रमौली यांच्या अपीलाच्या आधारावर न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या विरोधात दाखल सर्व एफआयआर सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी एक एफआयआर सादर केला त्यात यूएपीएसह विविध कलमान्वये प्रो. हरगोपाल आणि सुधा भारद्वाज यांच्यासह १५२ लोकांना आरोपी करण्यात आले आहे.