‘कोहिनूर’च्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला विविध संघटनांसह खुलताबादकरांचा पाठिंबा; सहसंचालकांच्या दिलाश्यामुळे उपोषणकर्त्यांना हुरूप!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कोहिनूर शिक्षण संस्था आणि कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयावर तातडीने प्रशासकाची नियुक्ती करावी आणि प्रभारी प्राचार्यांचे नियमबाह्य निलंबन तत्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रविवारी सार्वजनिक सुटीच्या दिवशी दिवसभर लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला खुलताबादेतील अनेक प्रतिष्ठितांसह विविध संघटनांनी स्वयंस्फूर्त पाठिंबा दिला. विशेष म्हणजे विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी उपोषणकर्त्यांनी भेट घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्याचा शब्द देत दिलासा दिला.

 कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान, सचिव आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान यांचा बेबंद कारभार आणि दडपशाहीविरुद्ध कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी एकवटले असून या त्रिकुटाच्या दडपशाहीविरुद्ध आवाज बुलंद करत त्यांनी रविवारी सार्वजनिक सुटीच्या दिवशी महाविद्यालायाच्या मुख्य इमारतीसमोरच दिवसभर लाक्षणिक उपोषण केले.

दिवसभरात खुलताबादेतील अनेक प्रतिष्ठित नागरिक, विविध संघटना तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. मझहर खान यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी तुम्ही आम्हाला कधीही आवाज द्या, आम्ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, खुलताबादेतील शैक्षणिक वातावरण गढूळ करण्याचा मझहर खानचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे आश्वासन विविध पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना दिले. बामुक्टोच्या पदाधिकाऱ्यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

वेतनाचा प्रश्न उद्भवणार नाही

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनीही दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन डॉ. निंबाळकर यांनी दिले. प्रा. डॉ. कमरून्नीसा बेगम यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सेवाज्येष्ठतेनुसार प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करून मान्यता दिली आहे. त्यामुळे वेतन देयकांसह अन्य कार्यालयीन कामकाजांशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्याचा अधिकार त्यांचा आहे. परिणामी तुमच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे डॉ. निंबाळकर म्हणाले. कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे, असेही डॉ. निंबाळकर म्हणाले.

…पण विद्यापीठाचे कोणीही फिरकलेच नाही

कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटित होऊन आपल्या विविध मागण्यांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत, ही बाब लक्षात घेऊन शासन प्रतिनिधी म्हणून विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘पालकत्व’ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एकही अधिकारी अथवा प्रतिनिधी या उपोषणाकडे फिरकला नाही. एवढ्या मोठ्या संख्येने प्राध्यापक आंदोलन करतात आणि ते करत असलेल्या बहुतांश मागण्या आपल्याशी संबंधित असल्यामुळे आपण त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे विद्यापीठ प्रशासनाला का वाटले नाही? असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या अशा

  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा आणणाऱ्या, सोयीसुविधांसह निकोप वातावरणापासून त्यांना वंचित ठेवणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मझहर खान, सचिव आस्मा खान, सहसचिव मकसूद खान व इतर पदाधिकाऱ्यांचे संस्थेतील अधिकार तत्काळ गोठवण्यात यावे.
  •  खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय आणि कोहिनूर शिक्षण संस्थेवर तत्काळ प्रशासकाची नियुक्ती करावी.
  •  कोहिनूर महाविद्यालयाच्या विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रभारी प्राचार्या डॉ. कमरून्नीसा बेगम यांचे नियमबाह्य निलंबन तत्काळ रद्द करण्यात यावे.
  • माजी प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्या प्राचार्य काळातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
  • न्यायालयाच्या आदेशाची, भारतीय संविधानाची आणि कोहिनूर शिक्षण संस्थेच्या घटनेची सातत्याने पायमल्ली करणारे मझहर खान, आस्मा खान, मकसूद खान माजी प्राचार्य शंकर अंभोरे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
  • हुकुमशाही व दडपशाही पद्धतीने कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण व अमानवीय पद्धतीने छळवणूक करणाऱ्या, जिविताची व नोकरीवर काढून टाकण्याची धमकी देऊन स्वतःच्या गुन्ह्यांमध्ये सामील करणारे कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मझहर खान, सचिव आस्मा खान व माजी प्राचार्य शंकर अंभोरे यांना महाविद्यालयाच्या परिसरात कायदेशीर पाबंदी करावी.
  • कोहिनूर शिक्षण संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची तत्काळ चौकशी करण्यात यावी.
  • महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवापुस्तिकांची संगनमताने विल्हेवाट लावणारे माजी प्राचार्य शंकर अंभोरे, संस्थेचे अध्यक्ष मझहर खान, सचिव आस्मा खान, सहसचिव मकसूद खान यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!