
मुंबईः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा प्रभाव म्हणून १६ ऑगस्ट २१ ऑगस्टदरम्यान राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा मोठा प्रभाव कोकणात दिसणार आहे. हा प्रभाव २१ ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई,कोकणासह मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या कालावधीत मराठवाड्यातील काही भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्य्ता आहे.
हवामान विभागाने मुंबईमध्ये येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून या भागासाठी रेडअलर्ट जारी केला आहे. मुंबईमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. आज सकाळपासूनच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबापुरीची तुंबापुरी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
१६ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट माथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यातही पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत संपूर्ण मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सहा दिवसांत मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आणि अधूनमधून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील तीन तासांसाठी संपूर्ण मराठवाड्याला रेडअलर्ट देण्यात आला असून बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
शनिवार १६ ऑगस्टः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर, अहमदनगर वगळता उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रविवार, १७ ऑगस्टः पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
सोमवार, १८ ऑगस्टः कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे-सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, बीड, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मंगळवार, १९ ऑगस्टः मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, धाराशिव, अहमदनगर, नाशिक, अकोला, नंदूरबार,धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
बुधवार, २० ऑगस्टः मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे व सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
सांताक्रुझमध्ये २४ तासांत २४४.७ मिमी पाऊस
मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला असून शुक्रवारी मध्यरात्रीपासून वाढलेला पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८,३० अशा २४ तासांत सांताक्रुझ येथे २४४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात रविवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
