![](https://newstown.in/wp-content/uploads/2023/03/sand-mining-e1682436772317-1024x585.jpg)
मुंबई: राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे तडवळ येथे अवैध पद्धतीने स्टोन क्रशर सुरु असून या माध्यमातून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यासंदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असतात. परंतु असे असतानाही राज्यात नियमबाह्य उत्खनन होत असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करुन स्टोन क्रशर चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.