राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे – वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ झाला असून अभियानाविषयी…
- वर्षा फडके-आंधळे
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात २ ऑक्टोबरपासून ‘हॅलो नव्हे – वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजेच गांधी जयंती दिनीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून झाला.
‘जनगणमन’हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गाणे हे सर्वमान्य झाले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर काही ठिकाणी ‘नमस्ते’ असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर ‘वंदे मातरम्’ हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते,
‘वंदे मातरम्’ हा फक्त नारा किंवा संबोधन नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे. ‘वंदे मातरम्’बाबत प्रचार-प्रसार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास व त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.
वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८७५ या वर्षामध्ये लिहिले होते. संस्कृत भाषेतील हे मूळ गीत पाच कडव्यांचे होते. मात्र सध्या पाचपैकी फक्त एक कडवेच गायले जाते. १८९६ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत सर्वप्रथम गायले गेले. १९०५ ला झालेल्या बंगालच्या फाळणी दरम्यान, ‘वंदे मातरम्’ हा परवलीचा शब्द होता. अनेक क्रांतिकारकांनी या गीताचा उद्घोष करत बलिदान दिले. ‘इन्कलाब जिंदाबाद’ व ‘वंदे मातरम्’ या दोन शब्दांनी स्वातंत्र्य चळवळ भारावून गेली होती. या गीतावर व त्याच्या गायनावर इंग्रजांनी बंदीही घातलेली होती. मात्र तत्कालीन राजकीय पक्ष, क्रांतिकारक व सर्वसामान्य नागरिक यांनी ही बंदी झुगारून वंदे मातरम् गायनास सुरुवात केली होती.
स्वातंत्र्य चळवळीतील धगधगत्या अग्निकुंडात बलिदान देणाऱ्या अनेक वीरांच्या मुखातून ‘वंदे मातरम्’ हा शब्द आला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मंत्र ठरलेले हे गीत सर्वमान्य होते. १४ ऑगस्ट १९४७ रोजी झालेल्या संविधान परिषदेच्या बैठकीची सुरुवातही या गीताने झाली होती. १९५० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी ‘वंदेमातरम्’ या गीताबद्दल पुढीलप्रमाणे नमूद केले होते :’शब्दों व संगीत की वह रचना जिसे जन गण मन सम्बोधित किया जाता है, भारत का राष्ट्रगान है; बदलाव के ऐसे विषय, अवसर आने पर सरकार अधिकृत करे और वन्दे मातरम् गान, जिसने कि भारतीय स्वतन्त्रता संग्राम में ऐतिहासिक भूमिका निभायी है; को जन गण मन के समकक्ष सम्मान व पद मिले। (हर्षध्वनि)। मैं आशा करता हूँ कि यह सदस्यों को सन्तुष्ट करेगा। (भारतीय संविधान परिषद, द्वादश खण्ड, २४-०१-१९५०). या विधानावरून या गीताची महती स्पष्ट होते. मद्रास उच्च न्यायालयाने शाळा व महाविद्यालये यांमधून ‘वंदे मातरम्’ हे गीत देशभक्तीची भावना रुजविण्याकरिता आठवड्यातून किमान एकदा तरी गायले जावे, असा निर्णय दिला होता. थोडक्यात ‘वंदे मातरम्’ हा शब्द सर्वांसाठीच प्रेरणादायी व सन्माननीय आहे.
‘हॅलो नव्हे – वंदे मातरम्’ या अभियानाबाबत बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणतात की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच ‘वंदे मातरम्’ ने शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांशी होणाऱ्या संवादात, सुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात. महाराष्ट्रात ‘नमस्कार’ व ‘राम राम’ हे दोन शब्द आजही मोठ्या प्रमाणात संबोधनात्मक वापरण्यात येतात. त्याशिवाय हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात. वेगवेगळे समूह, समुदाय, धर्म यांमध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत. वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे. शासकीय कार्यालयात किंवा शासन व्यवहारात दूरध्वनीवरून किंवा समोरासमोर भेटल्यानंतर कोणत्या शब्दाने अभिवादन करावे याबाबत स्पष्ट निर्देश कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर ‘वंदे मातरम्’ हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप मिळेल असे मला वाटते.
लघु चित्रपटाच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’ बाबत जाणीवजागृती करण्यात येणार आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता ‘वंदे मातरम्’ असे अभिवादन करावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले असून, यासाठीची काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे नमूद केली आहेत.
१. सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून ‘हॅलो’ संबोधन न वापरता, ‘वंदे मातरम्’ म्हणावे.
२. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित / अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा / महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला ‘हॅलो’ असे न म्हणता ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे.
३. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस ‘वंदे मातरम्’ हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
४. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात ‘वंदे मातरम्’ ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
५. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
६. विविध बैठका / सभांमध्ये वक्त्यांनी ‘वंदे मातरम्’ या शब्दांनी संभाषणाची सुरुवात करावी.