मुंबईः केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना खुल्या जीपमधून संबोधित केले. धनुष्यबाण चोरले ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन लढा देऊ. चोरबाजाराचे मालक धनुष्यबाण पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिंकाना त्यांनी खास बाळासाहेब ठाकरे स्टाईल संदेश दिला आणि निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश दिला.
ज्यांनी धनुष्यबाण चोरला आहे, त्यांनी मधमाशाच्या पोळावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा स्वाद घेतला आहे. अद्याप त्यांना मधमाशांचे डंख लागले नाहीत. हे डंख आता मारण्याची वेळ आली आहे, असे ठाकरे म्हणाले.
ज्या पद्धतीने आपले शिवसेना हेनाव चोराला दिले गेले. आपला धनुष्यबाण चोरांना दिला गेला. ज्या पद्धतीने हे कपटाने राजकारण करतात, त्या पद्धतीने मशाल चिन्हदेखील घालवतील. पण धनुष्यबाण चोरले त्यांना सांगतो, तुमच्यापुढे मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही थेट हल्लाबोल केला. असा आघात मागील ७५ वर्षांत कोणत्याही पक्षावर झाला नसेल. भाजपला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना असे वाटत असेल की त्यांच्या गुलाम बनलेल्या सरकारी यंत्रणा आमच्या अंगावर सोडून आम्हाला संपवता येईल. तर शिवसेना संपणे शक्य नाही. तुमच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही. यांना बाळासाहेबांचे नाव पाहिजे, पक्ष पाहिजे पण शिवसेनेचे कुटंब त्यांना नको आहे. बाळासाहेबांचा मुखवटा घालून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावे लागते, ही आपली ताकद आहे, असे ठाकरे म्हणाले.
मला कल्पना आहे की तुम्ही चिडलेले आहात. तरूण रक्त त्यांनी चेतवलेले आहे. आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलेलो आहे. खांद्याला खांदा लावून शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेऊन चोरांना धडा शिकवू. माझे आव्हान आहे की, ज्यांनी धनुष्यबाण चोरला, ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेले धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावे. मी मशाल घेऊन उभा राहतो. पाहू काय होते ते, असे खुले आव्हानच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला दिले आहे.