समृद्धी महामार्गावर लवकरच १६ ठिकाणी सर्वसुविधायुक्त पेट्रोलपंप, स्वच्छता गृहे, पिण्याचे पाणी आणि चहा-नाश्ता सुविधा!


नागपूर: समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व सोयीसुविधांसह रस्ते सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. या महामार्गावर १६ ठिकाणी सर्व सोयीसुविधांसह पेट्रोल, डिझेल पंप, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता अशा सुविधा चार महिन्यात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

समृध्दी महामार्गावर १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ घडलेल्या अपघाताबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शुक्रवारी या लक्षवेधीवर उत्तर देतांना भुसे बोलत होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील १६ ठिकाणांवर सर्व सोयीसुविधांसह पेट्रोल, डिझेल पंप, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.

समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करणे याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. वेग मर्यादा फलक ,चिन्ह फलक,सूचना फलक अशा उपाययोजना फलक लावण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरियर्स बसवण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून २० टक्के काम प्रगतिपथावर आहे. रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने माहितीपत्रके, फलक लावण्यात आलेले आहेत.

हा महामार्ग ज्या ८ जिल्ह्यांमधून जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागाचे प्रत्येकी १ तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ८ वाहने उपलब्ध देण्यात आली आहेत.

या पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे, रस्ता सुरक्षा विषयक जागृती करणे, वाहन चालकाचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्य करण्यात येतात. या उपाययोजना महामार्गावर अपघात रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या असल्याचे ही त्यांनी नमूद केले.

ज्या भागात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे, त्या-त्या ठिकाणी पुलाची निर्मिती केली आहे. वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्या कडेला बॅरिकेट लावण्यात आले आहे.

संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात असतांना झालेल्या या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणारे १३ प्रवासी मृत्यूमुखी पडले व २२ प्रवासी जखमी झालेले आहेत. या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली आहे.

 या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या १५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार २ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे ही भुसे यांनी सांगितले.

अपघातग्रस्त वाहनाची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने केली आहे. वाहनाची नोंदणीकृत आसन क्षमता १७+१ अशी असताना या वाहनांमधून बेकायदेशीर रित्या ३४ प्रवासी प्रवास करत होते. या वाहनास वेग नियंत्रक बसवलेले नव्हते. तसेच वाहनाच्या आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे.  

वाहन चालकास प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवण्यात येत होते. वाहनाचा कर वैध नसताना वाहन रस्त्यावर आणले इत्यादी त्रुटी या अपघातास कारणीभूत असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.

या महामार्गामुळे ९०० किमीचे अंतर ७०० किमी झाले आहे. वेळ आणि डिझेल, पेट्रोलची बचत देखील होत आहे. १५ जिल्ह्याचा विकास होत आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर ही शहरे जवळ आली आहेत. हा एक सकारात्मक प्रकल्प असल्याचे भुसे म्हणाले.

अपघातातील १३ मृत प्रवासीयांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये पाच लाख याप्रमाणे एकूण रुपये ६५ लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

वाहनधारकांकडून २७ लाख दंड वसुली

समृद्धी महामार्गावर करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान दोषी वाहनधारकांकडून २७ लाख २५ हजार ४५५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या महामार्गावर १ डिसेंबरपर्यंत जवळपास ४ हजार ५०० वाहनचालकाचे समुपदेशन करण्यात आले आहे. राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, अतिवेगाने वाहन चालवणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

रस्त्यावरील व महामार्गावरील अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांमार्फत नियमितपणे तसेच विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, अनिल परब, अनिकेत तटकरे, राजेश राठोड यांनी सहभाग घेतला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!