
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांच्या बेबंदशाही आणि अडेलतट्टू कारभारामुळे खुलताबादच्या कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२४ महिन्याचे रखडलेले वेतन आज २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ५९ दिवसांनंतर बँक खात्यात जमा झाले. त्यामुळे वेतनाअभावी उपासमारीची वेळ आलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यूजटाऊनने कोहिनूर महाविद्यालयाच्या गैरव्यवस्थापनावर वारंवार प्रकाश टाकला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक कार्यालयाने कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर २०२४ महिन्याच्या वेतनापोटी ८८ लाख ९१ हजार ४२५ रुपये वेतन अनुदान १ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या वेतन खात्यात हस्तांतरित केले होते. परंतु संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन अदा न करता १८ जानेवारी रोजी धनादेशाद्वारे विभागीय सहसंचालक कार्यालयाकडा जमा केले होते आणि महाविद्यालयाकडून वेतन अनुदानाची मागणी करण्यात आल्याशिवाय पुढील वेतन अनुदान देण्यात येऊ नये, असे लेखी पत्र महाविद्यालयाला दिले होते.
संस्थाचालकाच्या या भूमिकेनंतर विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी २१ जानेवारी रोजी महाविद्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. डॉ. निंबाळकर यांच्या महाविद्यालय भेटीच्या वेळी सिंघम स्टाइल राडाही झाला होता. महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन प्राचार्यांच्या नावे असलेल्या एकल वेतन खात्यातूनच झाले पाहिजे, असे विभागीय सहसंचालक डॉ. निंबाळकर यांनी वारंवार बजावूनही संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान हे महाविद्यालयाचे वेतन खाते प्राचार्य आणि संस्थेच्या अध्यक्षाच्या संयुक्त नावानेच राहील, या भूमिकेवर अडून बसले.
डॉ. मझहर खान यांची अडेलतट्टू भूमिका आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी लक्षात घेता उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांना ६ फेब्रुवारी रोजी पत्र लिहून कोहिनूर महाविद्यालयाविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने अधिष्ठातांची चौकशी समिती स्थापन केली. या चौकशी समितीचा अहवाल आणि त्या अहवालाआधारे विद्यापीठ प्रशासनाकडन कारवाई होणे अद्याप बाकी आहे.
दरम्यान, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सोमवारी विद्यापीठ आणि विभागीय सहसंचालक कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या. वेतनाअभावी आमची उपासमार होत असल्यामुळे रखडलेले वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी त्यांनी केली. अखेर उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. निंबाळकर हे गुरूवारी (२७ फेब्रुवारी) पुन्हा खुलताबादला गेले. त्यांनी खुलताबादेतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकांची भेट घेऊन अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन खाते हे प्राचार्यांच्या एकल नावाने असणे अनिवार्य असल्याचे शासन निर्णय व त्यातीला तरतुदी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान वितरित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालय आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये करार झालेला आहे. त्या करारातील अटीनुसार उच्च शिक्षण संचालनालयाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या निर्देशांचे पालन करणे बँक ऑफ महाराष्ट्रला बंधनकारक आहे. त्यामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांच्या निर्देशांनुसार गुरूवारी कोहिनूर महाविद्यालयाचे वेतन खाते प्राचार्यांच्या एकल नावे करण्याची प्रक्रिया बँक ऑफ महाराष्ट्रने काल गुरूवारीच पूर्ण केली आणि आज दुपारनंतर कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचे वेतन जमा झाले.
डिसेंबर महिन्याचे वेतन अदा झाल्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना येत्या तीन-चार दिवसांत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे वेतनही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान यांच्या बेबंदशाहीला चाप बसला असून महाविद्यालयाचे वेतन खाते प्राचार्यांच्या एकल नावे झाल्यामुळे वेतनासाठी त्यांना आता कर्मचाऱ्यांची अडवणूक करता येणार नाही.
