
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): संस्थाचालकाच्या आडमुठेपणामुळे खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२४ महिन्यापासूनचे वेतन रखडून पडले असून कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित व वेळेत अदा केले जाते की नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी असलेले सहसंचालक कार्यालय आणि संलग्नित महाविद्यालयातील गैरव्यवस्थापनाला चाप घालण्याची जबाबदारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे येथील कर्मचाऱ्यांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. या दफ्तर दिरंगाईमुळेच संस्थाचालकांची मुजोरी वाढू लागली आहे.
कोहिनूर शिक्षण संस्था संचलित खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२४ महिन्याचे वेतन विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून जानेवारी २०२५ च्या पहिल्याच आठवड्यात अदा करण्यात आले होते. परंतु कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी १८ जानेवारी रोजी हे वेतन धनादेशाद्वारे विभागीय सहसंचालक कार्यालयास परत केले होते आणि संस्थेकडून मागणी होईपर्यंत वेतन अदा करण्यात येऊ नये, असे पत्राद्वारे कळवले होते.
या घडामोडीनंतर विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी २१ जानेवारी रोजी कोहिनूर महाविद्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर प्राचार्यांच्या एकल वेतन खात्याद्वारेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले होते. वारंवार निर्देश देऊनही कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान हे संयुक्त वेतन खात्याद्वारेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे विभागीय सहसंचालकांनी ६ फेब्रुवारी रोजीडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांना पत्र लिहून कोहिनूर महाविद्यालयाविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
विभागीय सहसंचालकांच्या पत्रानंतर विद्यापीठ प्रशासनाने कोहिनूर महाविद्यालयाच्या चौकशीसाठी अधिष्ठात्यांची समिती स्थापन केली. या समितीने ११ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाला भेट देऊन चौकशी केलीही. ही समिती दोन दिवसांत चौकशी अहवाल देईल आणि महाविद्यालयाविरुद्ध कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. व्यवस्थापन परिषदेच्या १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दोन दिवसांत कारवाईचे आश्वासन कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. १४ दिवस उलटले तरी चौकशी समितीने अहवाल दिला की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनीही छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांना ११ फेब्रुवारी रोजी पत्र लिहून कोहिनूर महाविद्यालयासंबंधीचा स्वयंस्पष्ट वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या अहवालावर पुढे काय कारवाई झाली, हेही गुलदस्त्यातच आहे.
कोहिनूर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन आणि गैरव्यवस्थापनाबाबत विभागीय सहसंचालक कार्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाकडून होत असलेल्या दफ्तर दिरंगाईमुळे उपासमारीची वेळ आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सोमवारी विद्यापीठ आणि विभागीय सहसंचालक कार्यालय गाठून निवेदनाद्वारे आपल्या व्यथा मांडल्या. डिसेंबर महिन्यापासून आजपर्यंतचे वेतन रखडल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत, आमची उपासमार होत आहे. वेतनच न झाल्यामुळे बँकेचे हफ्ते, मुलाबाळांचे शैक्षणिक शुल्क भरणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आमचे डिसेंबर महिन्यापासूनचे वेतन तत्काळ अदा करा, अशी मागणी येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केली आहे.
आता आम्ही डिसेंबर महिन्याचे वेतन प्राचार्यांच्या वेतन खात्यात जमा केले आहे, ते अदा करण्याची जबाबदारी प्राचार्यांची आहे, असे सांगून विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी अंग काढून घेतले आहे तर प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे हे आणखी तीन-चार दिवसात विद्यापीठ कायद्यातील तरतुदींप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे सांगू लागले आहेत. या दोन यंत्रणांची टोलवाटोलवी आणि दफ्तर दिरंगाईमुळे कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मात्र हवालदिल झाल्याचे पहालया मिळत आहे.
