
मुंबईः विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात भरसभागृहात बसून मोबाइलवर रम्मी खेळतानाची चित्रफित व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज अखेर खराखुरा ‘खेळ’ झाला. कोकाटेंना कृषी मंत्रिपदावरून हटवण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही कोकाटेंचे मंत्रिपद मात्र कसेबसे वाचले आहे. भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचा कार्यभार कोकाटेंना देण्यात आला आहे. गुरूवारी रात्री उशिरा कोकाटेंच्या ‘पदावनती’वर शिक्कामोर्तब झाले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात बसून मोबाईलवर रम्मी खेळतानाची चित्रफित व्हायरल झाली. या चित्रफितीवरून विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंना कडक शब्दांत समज देऊन त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला.
कोकाटे यांच्या मंत्रिपदावरून आज दिवसभर वेगवान घडामोडी झाल्या. गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद काढून न घेता त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील खात्यांची आदलाबदल करण्याबाबतचे पत्र दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विनंती मान्य करून हा खाते बदल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना कळवला.
कृषी विभागाच्या मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधाने करत राहिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कृषी विभाग म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, पंचनामे काय ढेकळाचे करायचे काय, अशी वादग्रस्त वक्तव्ये कोकाटेंनी केली. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली. त्यातच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोबाईलवर रम्मी खेळताना ते व्हिडीओत पकडले गेले. मी रम्मीची जाहिरात स्कीप करत होतो, असे सांगत त्यांनी या ‘खेळा’चे लंडगे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. हे समर्थन करत असताना मी काही कोणाचा विनयभंग केलेला नाही, असेही ते बोलून गेले. शेतकरी नव्हे तर शासनच भिकारी आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करुन त्यांनी आपल्या अडचणी आणखीच वाढवून घेतल्या.
कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर कृषी खाते राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने या खात्याची जबाबदारी असायला हवी. कोकाटे हे ताळतंत्र सोडून बेताल विधाने करत सुटले असल्यामुळे त्यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात यावा, असा मतप्रवाह सत्ताधारी महायुतीमध्ये जोर धरू लागला. अखेर आज कोकाटेंकडून कृषी विभागाची जबाबदारी काढून घेऊन ती दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोकाटेंना कडक शब्दांत निर्वाणीचा इशारा
आतापर्यंत तुमच्या खूप चुका झाल्या. तुम्हा खूप सांभाळून घेतले. मी आणि सुनिल तटकरे यांनी सांगूनही तुम्ही ऐकत नाहीत. याचा अर्थ तुम्हाला पक्षनेतृत्वाचा धाक नाही, असा त्याचा अर्थ होतो. झाले ते खूप झाले. खरे तर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे होते. पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन आणि यापुढे आपण कुठलेही गैरवर्तन करणार नाही, या अटीवर तुम्हाला तूर्तास मंत्रिपदावर ठेवतो. यापुढे काही चूक केल्याचे आढळले तर तुमचे मंत्रिपद काढावे लागेल, अशा कडक शब्दांत अजित पवार आणि सुनिल तटकरेंसोबतच्या बैठकीत कोकाटेंना निर्वाणीचा इशारा देण्यात आल्याचे समजते.
