
मुंबई: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील भू संपादनाखाली अवैधरित्या वितरीत करण्यात आलेली ७३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाच्या ‘मावेजा’ वाटपात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात आ. काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे बोलत होते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील संपादनाखालील जमिनीशी निगडीत लवाद आदेशासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या बदलीनंतर जुन्या तारखा टाकून तत्कालिन लवाद तथा जिल्हाधिकारी यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी नमूद करुन लवाद आदेश निर्गमित केलेल्या प्रकरणामधील फिर्यादीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी यांना दिनांक ७ मे, २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे, असे बावनकुळे म्हणाले.
यासंदर्भातील एकूण १५४ मूळ प्रकरणामधील निवाड्याची रक्कम रुपये ६८.५८ कोटी वरून लवादाने ३१०.२० कोटीपर्यंत वाढ केल्याचे तसेच त्यापैकी ७३ कोटी रुपये संबंधित भूधारकांना भूसंपादन जायकवाडी प्रकल्प व उपविभागीय अधिकारी, बीड कार्यालयाकडून वाटप झाल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत या ७३ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग अधिनियमांतर्गत भूसंपादनाचा मोबदला संबंधित भूधारकाची मालकी हक्काशी संबंधित तसेच बँक खात्याशी निगडीत कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच केंद्रशासनाच्या भूमिराशी पोर्टल मार्फत वाटप केला जातो असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. या चर्चेत आ. बबनराव लोणीकर यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.
