महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार, झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण; सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण, वाचा संपूर्ण यादी

नवी दिल्ली:  देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तसेच महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्रातून प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इदाते व गजानन माने, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया, साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणेंचा गौरवः

पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम खुणे हे मूळ गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. ते प्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी असून त्यांनी आतापकर्यंत ५ हजार नाटकांच्या प्रयोगांमध्ये ८०० पेक्षा जास्त भूमिका केल्या आहेत.

या वर्षी देशातील एकूण १०६  मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म विजेत्यांमध्ये १९ महिला तर दोन परदेशी नागरिक आहेत. ७ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 पद्मविभूषण

  • बालकृष्ण दोषी (मरणोत्तर): क्षेत्र- वास्तुविशारद, गुजरात.
  • झाकीर हुसेन, क्षेत्रः कला, महाराष्ट्र.
  • एस.एम.कृष्णा, क्षेत्रः सार्वजनिक जीवन, कर्नाटक.
  • दिलीप महालनबीस(मरणोत्तर), क्षेत्रः मेडिसीन, पश्चिम बंगाल.
  • श्रीनिवास वर्धन, क्षेत्रः विज्ञान व अभियांत्रिकी, अमेरिका.
  • मुलायमसिंह यादव(मरणोत्तर), क्षेत्रः सार्वजनिक जीवन, उत्तर प्रदेश.

पद्म भूषण

  • एस.एल. भैरप्पा, क्षेत्रः साहित्य व शिक्षण, कर्नाटक
  • कुमार मंगलम बिर्ला, क्षेत्रः व्यापार व उद्योग, महाराष्ट्र
  • दीपक धर, क्षेत्रः विज्ञान व अभियांत्रिकी, महाराष्ट्र
  • वाणी जयराम, क्षेत्रः कला, तामिळनाडू
  • स्वामी चिन्ना जीयार, क्षेत्रः अध्यात्म, तेलंगणा
  • सुमन कल्याणपूर, क्षेत्रः कला, महाराष्ट्र
  • कपील कपूर, क्षेत्रः साहित्य व शिक्षण, दिल्ली
  • सुधा मूर्ती, क्षेत्रः समाज सेवा, कर्नाटक
  • कमलेश डी. पटेल, क्षेत्रः अध्यात्म, तेलंगणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *