औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण, देशातील पहिलाच उपक्रम


नवी दिल्ली: महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ईवरील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) ते पैठण दरम्यानच्या ५१ वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पाहणी केली.

औरंगाबाद येथील पैठण येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री यांनी वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची पाहणी केल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला व याबाबत माहिती दिली. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्‍लागार अशोक कुमार जैन, राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रविंद्र इंगोले, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, तहसीलदार विजय चव्हाण आदि उपस्थित होते.

औरंगाबाद ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात सध्याच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला ५० ते १०० वर्षे जुनी ५१ वटवृक्षे होती. ही जुनी महाकाय झाडे तोडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण करणे शक्‍य नव्हते. पण ती न तोडता अन्य ठिकाणी पुनर्रोपण करून पुनर्जीवित करण्याचा विचार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जायकवाडी धरणामुळे भूजल पातळी चांगली असल्याने यासाठी पैठण देवभूमीची निवड करण्यात आल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वृक्षपुनर्रोपणाचा हा देशातील पहिला आणि एकमेव उपक्रम असून ५१ झाडांचे पुनर्संचयन आणि पुनर्रोपण यशस्वीरित्या करण्यात आले आहे. ही झाडे आगामी काळात प्रतिकूल हवामान बदलाची परिस्थिती आणि नैसर्गिक घटनांचे परिणाम परतवून लावतील आणि भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण, वन्यजीव अधिवास सुधारण्यासाठी आणि मातीची धूप कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गडकरी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पर्यावरण सुधारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत नव्याने बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूंच्या क्षेत्रफळानुसार मोठी झाडे लावण्याचा सरकारचा उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगतिले. हरित महामार्गाची निर्मिती भारताला स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे ही मंत्री महोदयांनी नमूद केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!