‘शिक्षण महर्षि’ जनार्दन म्हस्केंचा जावई रतन वाघला १० लाख रुपये दंड आणि एक वर्षे कारावासाची शिक्षा


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ‘शिक्षण महर्षि’ जनार्दन म्हस्के यांचा जावई आणि सिडकोतील नूतन बहुउद्देशीय हायस्कूलचा माजी मुख्याध्यापक रतन वाघ याला ११ वे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. डी.एम. भंडे यांनी हातउसने घेतलेल्या पैशांच्या धनादेश अनादर प्रकरणी १० लाख रुपये दंड आणि एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ‘शिक्षण महर्षि’ जनार्दन म्हस्के यांचा जावई रतन आसाराम वाघ हा याच संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या जळगाव रोडवरील नूतन बहुउद्देशीय हायस्कूलचा मुख्याध्यापक होता. सिल्लोड शिक्षण संस्थेमध्ये आपले चांगले नाव आहे, असे भासवून रतन वाघ याने फिर्यादी अनिल सदाशिव बनकर यांचा विश्वास संपादन केला. रतन वाघ याचे मोठे ऑपरेशन झालेले होते. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता. ही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रसंबंधामार्फत रतन वाघ हा अनिल बनकर यांच्यापर्यंत पोहोचला.

रतन वाघने अनिल बनकर यांच्याकडे ५ लाख रुपये हातउसने देण्याची मागणी केली. रतन वाघची आर्थिक अडचण समजून अनिल बनकर यांनी रतन वाघला साक्षीदारांसमक्ष मार्च २०१७ मध्ये  ५ लाख रुपये दिले. ही रक्कम तीन वर्षांत परत करतो, असे आश्वासन रतन वाघ याने ही रक्कम घेताना अनिल बनकर यांना दिले होते.

रतन वाघने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही रक्कम २०२० मध्ये अनिल बनकर यांना देणे बंधनकारक होते. परंतु रतन वाघ याने ही रक्कम स्वतःहून दिली नाही. जेव्हा बनकर यांना पैशांची गरज भासली तेव्हा त्यांनी रतन वाघला हातउसने घेतलेले ५ लाख रुपये परत देण्याची विनंती केली. तेव्हा रतन वाघने एवढी रक्कम देऊ शकत नाही, असे सांगत काही दिवसांची मुदत मागितली.

अनिल बनकर यांनी १९ सप्टेंबर २०२० रोजी रतन वाघ याच्याकडे हातउसने घेतलेले ५ लाख रुपये परत करण्याची विनंती केली. तेव्हा रतन वाघने या रकमेची पोच पावती दिली आणि याच दिवशी दोघांमध्ये एक करार तयार करून पुढील तारखेचा म्हणजेच २१ डिसेंबर २०२० रोजीचा आयसीआयसीआय बँकेचा ५ लाख रुपयांचा धनादेश (क्रमांक ०००४१२) दिला.

२१ डिसेंबर २०२० पर्यंत खात्यात ५ लाख रुपये जमा करून ठेवतो, असे आश्वासन रतन वाघने दिले होते. त्यानुसार अनिल बनकर यांनी हा धनादेश वटवण्यासाठी टाकला असता रतन वाघच्या खात्यात ‘अपुरी रक्कम’ असल्यामुळे १८ फेब्रुवारी २०२१ रोजी हा धनादेश न वटता परत आला.

अनिल बनकर यांनी ही बाब रतन वाघ याला कळवून पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे बनकर यांनी १५ मार्च २०२१ रोजी रतन वाघला वकिलामार्फत नोटीस बजावली आणि नोटीस मिळल्यापासून १५ दिवसांत धनादेशात नमूद रक्कम परत करण्याबाबत कळवले. रतन वाघला ही नोटीस १७ मार्च २०२१ रोजी मिळाली. तरीही त्याने पंधरा दिवसात ही रक्कम परत केली नाही. त्यामुळे अनिल बनकर यांनी रतन वाघविरुद्ध पराक्रम्य संलेख अधिनियमाचे कलम १३८ अन्वये फिर्याद दाखल केली होती.

या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ नुसार रतन वाघचा जबाब नोंदवण्यात आला. तेव्हा अनिल बनकर हे माथाडी हमाली कामगार असून २०१७ मध्ये त्यांना १५ ते २० हजार एवढीच रक्कम महिन्याला मिळत होती. बनकर हे इन्कम टॅक्स रिटर्नही भरत नव्हते. त्यांचा माझा कधीही संबंध आलेला नाही. व्यवहार कशाबाबतचा आहे, हे बनकर यांनी कुठेही सांगितलेले नाही. सिक्युरिटी म्हणून दिलेल्या धनादेशाचा बनकर यांनी गैरवापर केला, असे सांगून रतन वाघने या जबाबात अंग झटकण्याचा प्रयत्न केला. अनिल बनकर यांच्याकडे ही रक्कम कुठून व कशी आली, असा युक्तिवादही रतन वाघच्या वकिलांनी केला. परंतु रतन वाघच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला.

रतन वाघला यापूर्वी देखील दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली असून ही प्रकरणे अलिपामध्ये प्रलंबित आहेत. जवळपास पाच वर्षांपासून रतन वाघ याने अनिल बनकर यांचे हातउसने घेतलेले पैसे आश्वासन देऊनही परत केले नाही. त्यामुळे बनकर यांना ५ वर्षांपासून न्यायालयात येऊन त्यांनीच दिलेल्या पैशांसाठी ही फिर्याद दाखल करून चालवावी लागली. त्यामुळे या प्रकरणात रतन वाघला जास्तीत शिक्षा देण्यात यावी आणि अनिल बनकर यांना वादातीत धनादेशाची दुप्पट रक्कम देण्यात यावी, असा युक्तिवाद बनकर यांच्या वकिलांनी केला.

 दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.  डी. एम. भंडे यांनी रतन आसाराम वाघ याला फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २५५ (२) अन्वये परक्राम्य संलेख अधिनियमाचे कलम १३८ अन्वये दोषी ठरवून एक वर्ष साधा कासावास आणि दंड म्हणून धनादेशाची दुप्पट रक्कम १० लाख रुपये अशी शिक्षा ठोठावली.  या खटल्यात फिर्यादी अनिल बनकर यांच्या वतीने ऍड. जी. के. मुनेश्वर यांनी तर आरोपी रतन वाघ याच्या वतीने ऍड. डी.डी. कांबळे यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!