तुम्ही कोर्टात केस बांधत जाऊ नका, कामकाजात अडथळे येतात; पुण्यातील महिला वकिलांना निबंधकाची नोटीस


पुणेः पुणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रारने महिला वकिलांना बजावलेल्या एका कथित नोटीसीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तुम्ही न्यायालयात केस बांधू नका, त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहे, अशी सूचना या नोटिशीमध्ये महिला वकिलांना करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी पुणे जिल्हा न्यायालयात डकवण्यात आलेल्या या नोटिशीचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून वाद निर्माण होताच ही नोटीस मागे घेण्यात आल्याचे ‘बार अँड बेंच’ने म्हटले आहे.

  महिला वकील अनेकदा खुल्या न्यायालयात त्यांचे केस बांधत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महिला वकिलांनी यापुढे असे करणे टाळावे, अशी सूचना करण्यात येत आहे, असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे. २० ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हा न्यायालयाच्या नोटीस बोर्डावर ही नोटीस डकवण्यात आली. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी या नोटिशीचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ‘वाह… हे पहा! महिला वकिलांमुळे कोण विचलित होत आहे आणि का?’  असा सवाल इंदिरा जयसिंग यांनी हा फोटो शेअर करत केला आहे.

 दरम्यान, या नोटिशीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर ही नोटीस मागे घेण्यात आल्याचे ‘बार अँड बेंच’ने म्हटले आहे. न्यायालयीन कक्षाच्या मर्यादांचे पालन व्हावे या हेतूने ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे सूत्रांनी सांगितल्याचे ‘बार अँड बेंच’ने म्हटले आहे. मात्र या नोटिशीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर कोणताही वाद टाळण्यासाठी ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!