आता एसएचआरसी मूल्यांकन अहवालाच्या रँकिंगनुसारच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्या!


मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) नवी दिल्ली’ ही संस्था देश पातळीवर आरोग्य विभागास तांत्रिक सहकार्य करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे’ ही संस्था कार्यरत आहे.  राज्याच्या आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढ, आरोग्यविषयक संशोधन व तांत्रिक सहकार्य या संस्थेच्या वतीने देण्यात येते. आरोग्य विभागामार्फत एसएचआरसी  संस्था राज्यातील सर्व जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करते. तसेच त्यांचे कामगिरीवर आधारित गुणवतेनुसार दरमहा (रँकिंग) गुणानुक्रम देत असते.

या रँकिंग प्रणालीमध्ये प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय बाबींचा समावेश असतो. यापुढे  सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली, बढती करताना, कामगिरीवर आधारित मूल्यांकन (रँकिंग) प्रणालीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य सेवेचे कामकाज अधिक पारदर्शक होईल.

राज्यातील आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध होत असतो. या निधीबरोबरच नागरिकांना आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबीलिटी (सीएसआर)’ माध्यमातूनही निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने सीएसआर देणाऱ्या संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डीपीएम) व जिल्हा लेखा व्यवस्थापक (डीएएम), एनएचएम सल्लागार व एनएचएम कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात. भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. असे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले. यावेळी पदभरती, मानव संसाधन सुसूत्रीकरण, अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या संस्थाच्या बाबतचे सादरीकरण करण्यात आले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई.रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव, सह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत, सह संचलिका डॉ. सरिता हजारे, माजी महासंचालक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. मोहन जाधव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!