छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कंत्राटदारामार्फत काम करणारे कर्मचारी विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर सेवेत घेण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून काम बंद आंदोलन करत आहेत. अशातच एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने कुलगुरूंच्या कक्षात साप सोडण्याची धमकी दिल्यामुळे विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने साप पकडणारे सर्पमित्र बोलावून घेतले तर सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आपल्या आंदोलनाचा विचका होण्याच्या भीतीने आंदोलक कर्मचारीही धास्तावून गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उस्मानाबाद उपकेंद्र, धनसावंगी येथील मॉडर्न कॉलेज आणि पैठण येथील संत पीठात कंत्राटदारामार्फत ४४३ कर्मचारी गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. आता याच कर्मचाऱ्यांनी आम्हाला कंत्राटदारामार्फत नको तर विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर सेवेत घ्या, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून काम बंद आंदोलन करत आहेत.
आंदोलक कर्मचाऱ्यांना विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पाठिंबा देत आहेत. राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशाननाने या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या बहुतांश राजकीय पक्षांनी घेतली आहे.
आ. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनेही या आंदोलक कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. संघटनेचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदाधिकारी कुणाल राऊत यांनी या आंदोलक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या भेटीची वेळ मागितली, परंतु ती त्यांना नाकारण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या राऊत यांनी कुलगुरूंनी भेटीची वेळ न दिल्यास त्यांच्या कक्षात साप सोडण्याची धमकी दिली आणि विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने साप पकडणारे सर्पमित्र बोलावून घेतले. बेगमपुरा पोलिसही सतर्क झाले. पोलिसांचा ताफा विद्यापीठात तैनात करण्यात आला. मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार कुलूपबंद करण्यात आले. तेवढ्यात राऊत हे साप घेऊन विद्यापीठ परिसरात ज्या ठिकाणी काम बंद आंदोलनावर बसले आहेत, तेथे आले. त्यावेळी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे नेते डॉ. कैलास पाथ्रीकर हे आंदोलकांशी चर्चा करत होते.
पोलिसांनी कुणाल राऊत यांची मनधरणी केली. कुलगुरूंशी भेट घालून देण्याचा शब्द दिला. त्यामुळे राऊत यांनी सोबत आणलेला साप काही बाहेर काढलाच नाही. कुलगुरूंशी चर्चेसाठी राऊत यांना घेऊन पोलिस निघाले. तेव्हा राऊत यांनी कुलगुरूंशी चर्चेसाठी माझ्यासोबत चला, असा आग्रह आंदोलक कर्मचाऱ्यांना धरला. पण त्यांच्यासोबत जाण्यास ना आंदोलक कर्मचाऱ्यांचा नेता तयार झाला, ना एखादा कर्मचारी तयार झाला. शेवटी राऊत हे एकटेच पोलिसांसोबत जाऊन कुलगुरूंशी चर्चा करून आले.
आंदोलकांना विचका होण्याची धास्ती
कंत्राटदारांमार्फत काम करणारे हे कर्मचारी आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. विद्यापीठ प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींशीही त्यांची चर्चा सुरू आहे. त्यातून सकारात्मक तोडगा निघेल, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात साप सोडण्यासारखे अघोरी प्रकार केले तर आपल्या आंदोलनाचा विचका होईल, आपले आंदोलन मोडून काढले जाईल आणि आपल्या हाती काहीच लागणार नाही, अशी भीती राऊत यांच्या धास्तीमुळे आंदोलक कर्मचाऱ्यांत निर्माण झाली, त्यामुळेच त्यांच्यासोबत कुलगुरूंकडे कुणीही गेले नसल्याचे सांगण्यात आले.