जमखंडीः ‘काँग्रेसने मला ९१ शिव्या दिल्या’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर रविवारी काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला. मी असा पहिलाच प्रधानमंत्री पाहिला आहे की, ज्याच्या हातात जनतेच्या समस्यांची लिस्ट नाही. मात्र शिव्यांची लिस्ट आहे, अशा शब्दांत कर्नाटकातील एका प्रचारसभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टिकास्त्र सोडले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कर्नटकात प्रचारसभा घेत आहेत. काँग्रेस नेत्यांनी मला ९१ वेळा शिव्या दिल्या, असे वक्तव्य शनिवारी एका प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी- वाड्रा यांनी जमखंडी येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना चांगलाच समाचार घेतला.
मी असा पहिला प्रधानमंत्री पाहिला आहे की, जो जनतेसमोर रडगाणे करतो की मला शिव्या दिल्या जात आहेत. प्रधानमंत्र्यांकडे जनतेच्या समस्यांची यादी नाही. मात्र शिव्यांची यादी आहे. जर काँग्रेसने भाजपने दिलेल्या शिव्यांची यादी तयार करायला सुरूवात केली तर अनेक पुस्तके लिहावी लागतील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
मी पहिल्यांदाच असा प्रधानमंत्री पहात आहे, जो जनतेसमोर रडतो आहे की त्यास शिव्या दिल्या जात आहेत. तो तुमचे दुःख ऐकून घेण्याऐवजी आपलेच दुःख सांगत बसला आहे. त्यांच्या कार्यालयातील कुणीतरी एक यादी तयार केली आहे. ती यादी तुमच्या (जनतेच्या) समस्यांची नाही. प्रधानमंत्र्यांना कोणी कितीवेळा शिव्या दिल्या याची ती यादी आहे. तुम्ही या शिव्या कमीत कमी एका पानावर लिहिल्या तरी आहेत. जर आम्ही लोकांना आमच्या कुटुंबाला दिलेल्या शिव्या मोजायला सुरूवात केली तर त्यांची पुस्तके होतील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
जमखंडी येथील याच सभेत प्रियंका गांधी यांनी प्रधानमंत्री मोदींना आव्हानच दिले आहे. हिम्मत बांधा मोदीजी, माझ्या भावापासून शिका. तो म्हणतो ‘गाली’च (शिव्या) काय तर मी देशासाठी ‘गोली’ ही खायला तयार आहे. मोदीजी घाबरू नका. हे सार्वजनिक जीवन आहे. येथे सगळे सहन करावेच लागते, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
तत्पूर्वी प्रियंका गांधी यांनी बेळगावी येथेही निवडणूक प्रचारसभेला संबोधित केले. भाजपने केवळ आणि केवळ जनतेला धोका दिला आहे. लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यावरून विचलित करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. बेरोजगारीवर कुणीही बोलायला तयार नाही. कोणत्याही विकास कामांचा उल्लेख नाही. त्यांच्याकडे फक्त एकच मुद्दा आहे की, त्यांना कितीवेळा शिव्या दिल्या गेल्या, असे प्रियंका म्हणाल्या.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम दिवसेंदिवस पेटत चालला आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सोनिया गांधीचे नावही ओढले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी प्रधानमंत्री मोदींची विषारी सापाशी केली होती. नंतर हे वक्तव्य एखाद्या व्यक्तीबाबत नाही तर भाजपच्या विचारधारेबाबत केले होते, असा खुलासा केला. नंतर भाजप आमदार बासनगौडा यतनाल यांनी सोनिया गांधींना ‘विषकन्या’ म्हटले होते.