परभणी हिंसाचारः तरूण कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचे संभाजीनगरात होणार ऑन कॅमेरा शवविच्छेदन, उद्या महाराष्ट्र बंदची हाक


परभणीः परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान झालेली जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरूण कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथच्या मृतदेहावर छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) न्यायालयाच्या निगराणीत शवविच्छेदन केले जाणार आहे. दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या घटनेच्या निषेधार्थ उद्या (१६ डिसेंबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

मंगळवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या घटनेचे पडसाद परभणी शहरात लगेचच उमटले. आंबेडकरी समुदायाने रस्ता रोको आणि रेल रोको आंदोलन केले.

बुधवारी ११ डिसेंबर रोजी या विटंबनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला दुपारनंतर गालबोट लागले आणि दगडफेक तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांवर लाठीमार केला. या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी परभणी पोलिसांनी आठ ते नऊ गुन्हे दाखल केले असून जवळपास २०० जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः परभणी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरूण कार्यकर्त्याचा कोठडीतच मृत्यू, शहरात पुन्हा तणावाचे वातावरण

पोलिसांनी अटक केलेल्या आंबेडकरी अनुयायांपैकी काही जणांना पोलिस कोठडी तर काही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरूणाचा आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

आज सकाळी छातीत दुखू लागल्याची तक्रार सोमनाथ सूर्यवंशीने तुरूंग प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

आता सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) न्यायालयाच्या निगराणीत ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) हे शवविच्छेदन केले जाणार आहे.

सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. परभणी शहरातील बाजारपेठा लगेचच बंद करण्यात आल्या. आंबेडकरी अनुयायांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी हा तरूण आंबेडकरी कार्यकर्ता एलएलबीचे शिक्षण घेत होता. त्याचा मृत्यू झाल्यामुळे परभणीत पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी एसआरपीएफच्या तुकड्या बोलावण्यात आल्या आहेत.

 उद्या महाराष्ट्र बंद

न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या घटनेच्या निषेधार्थ उद्या १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!