छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उच्च शिक्षण संस्थामध्ये चालणारे संशोधन आणि त्याचा दर्जा व गुणवत्ता याबाबत धक्कादायक तथ्य न्यूजटाऊनच्या हाती लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न संशोधन केंद्रांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी पीएच.डी.साठी संशोधन करतात, परंतु या सर्वोच्च पदवीसाठी केल्या जाणाऱ्या संशोधनात अनेकांकडून उचलेगिरी करून केवळ पाट्या टाकण्याचेच काम केले जात आहे. वाणिज्य विषयातील एका महाभाग ‘विद्यावाचस्पती’च्या प्रबंधात तब्बल ९४ टक्के वाङ्मयचौर्य असतानाही २०१४ मध्ये त्याला ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आल्याचे ‘न्यूजटाऊन’ने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापकपदाच्या अनिवार्य अर्हतेत नेट/सेटला पीएच.डी.चा पर्याय दिल्यानंतर वर्षानुवर्षे नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेले आणि सहायक प्राध्यापक होण्यास इच्छूक असलेले अनेक ‘होतकरू’ उमेदवार पीएच.डी.कडे वळले. त्यानंतर बार्टी, सारथी, महाज्योतीसारख्या राज्य अर्थसहाय्यित संस्थांकडून पीएच.डी.च्या संशोधनासाठी फेलोशिप सुरू झाल्या. त्यामुळे पीएच.डी. ला नोंदणी मिळवण्यापासून ते संशोधन मार्गदर्शक निश्चित करण्यापर्यंत फिल्डिंग लावून या ‘होतकरूं’नी ‘संशोधना’त उडी घेतली आणि अचानकपणे विद्यापीठांमधून ‘विद्यावाचस्पती’ होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
याच काळात सहायक प्राध्यापक म्हणून आधीच कार्यरत असलेल्या अनेकांनी त्यांच्या संशोधनाला गती दिली. त्यामुळे विद्यापीठांकडून प्रदान होणाऱ्या या पदवीच्या संख्येत आणखी वाढ झाली. या सहायक प्राध्यापकांनी पीएच.डी. प्रदान करून घेऊन त्या पदवीच्या आधारे वेतननिश्चिती, निवडश्रेणी आणि पदोन्नती मिळवल्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू झाल्यानंतर किमान या संशोधनाची व्यवहार्य उपयोगिता काय?, हे तपासून पाहण्याची आवश्यकता कोणत्याही नियामक संस्थेला वाटली नाही. त्यामुळे हे संशोधन बिनबोभाटपणे सुरूच राहिले. या सर्व पार्श्वभूमीवर या संशोधनाचा किमान दर्जा आणि गुणवत्ता तरी काय? हे तपासून पाहण्याचे न्यूजटाऊनने ठरवले. प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यूजटाऊनने केलेल्या या संशोधनात धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. त्यापैकी एका संशोधनाची तथ्ये अशी-
जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेव येथील अतीश उत्तमराव राठोड यांनी २००२-०३ या शैक्षणिक वर्षात वाणिज्य विषयात पीएच.डी.साठी प्रवेश मिळवला. जालना येथील मत्स्योदरी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी मदान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘ए स्टडी ऑफ लेबर वेल्फेअर प्रॅक्टिसेस इन स्मॉल-मेडियम इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र स्टेट’ या विषयात २००२-०३ ते २०११-१२ अशी तब्बल नऊ वर्षे संशोधन केले. आणि ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी आपला पीएच.डी.चा प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सादर केला. मार्च २०१५ मध्ये त्यांना पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली.
अतीश राठोड यांनी त्यांचा प्रबंध सादर केल्यानंतर विद्यापीठाने त्यांचा प्रबंध तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवला. या तज्ज्ञांनी ‘समाधानकारक’ अहवाल दिल्यानंतर अतीश राठोड यांचा व्हायवा झाला आणि त्यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली.
सामाजिक शास्त्रातील व्यष्ठी अध्ययन पद्धतीचा अवलंब करून न्यूजटाऊनने जे संशोधन केले, त्यात डॉ. अतीश राठोड यांच्याही पीएच.डी.च्या प्रबंधाचा समावेश आहे. अतीश राठोड यांनी पीएच.डी.साठी सादर केलेल्या ३३० पानी प्रबंधाचा साधर्म्य निर्देशांक म्हणजेच सिमिलॅरिटी इंडेक्स तब्बल ९४ टक्के आहे. याचा दुसरा अर्थ असा की अतीश राठोड यांच्या प्रबंधातील तब्बल ९४ टक्के मजकूर हा कॉपीपेस्ट म्हणजे वाङ्मयचौर्य करून घेतलेला असल्याचे न्यूजटाऊनच्या संशोधनात आढळून आले आहे.
विशेष बाब म्हणजे अतीश राठोड यांनी त्यांच्या प्रबंधातील तब्बल ९२ टक्के साहित्य हे इंटरनेट स्रोतांकडून उचलून कॉपी पेस्ट केलेले आहे. त्यापैकी २२ टक्के साहित्य तर ‘शोधगंगा’ या विद्यापीठ अनुदान आयोगानेच विकसित केलेल्या वेबसाईटवरून घेतलेले आहे. म्हणजेच अन्य संशोधनकर्त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधातून उचलले आहे. या प्रबंधातील २६ टक्के साहित्य हे विविध प्रकाशनांमधून उचलले आहे तर ५३ टक्के साहित्य हे स्टुडंट्स पेपर्समधून उचलण्यात आले असल्याचेही निदर्शनास आले आहे.
अतीश राठोड यांनी त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाचे प्रस्तावनेचे पहिलेच प्रकरण ५८ पानांचे आहे. या ५८ पानांच्या प्रकरणातील मोजून १७३ शब्द स्वतःचे लिहिले आहेत. उर्वरित सर्वच्या सर्वच वाङ्मय इंटरनेट स्रोत, प्रकाशने आणि स्टुंडट्स पेपर्समधून उचलण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे या पीएच.डी.च्या प्रबंधातील ६ वे प्रकरण ‘लेबर वेल्फेअर मेजर्स अँड इट्स इम्पॅक्ट इन सिलेक्टेड स्मॉल-मेडियम इंडस्ट्रीज’ या प्रकरणातील एकही शब्द, आकडेवारी, ग्राफ्स, तक्ते आणि त्याचे विश्लेषण उचलेगिरी करून घेतलेले नसून हे वाङ्मय मूळ म्हणजेच संशोधकाचे स्वतःचे आहे.
अतीश राठोड यांनी ही पीएच.डी.चा प्रबंध सादर केला तेव्हा ‘विदयापीठ अनुदान आयोग (उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यामूलक सत्यनिष्ठा आणि साहित्यिक चोरीच्या प्रतिबंधाला प्रोत्साहन) नियम’ अस्तित्वात नव्हता, हे खरे असे असले तरी तब्बल ९४ टक्के साधर्म्य निर्देशांक म्हणजेच ९४ टक्के उचलेगिरी असलेला हा पीएच.डी.चा प्रबंध आशीष राठोड यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. शिवाजी मदान यांनी विद्यापीठाकडे सादर करण्यास हरकत का घेतली नाही? त्यांनी हा प्रबंध न वाचताच त्यावर स्वाक्षरी केली का? हा प्रबंध विद्यापीठाकडे सादर केल्यानंतर ज्या तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, त्या तज्ज्ञांनीही तो वाचला का नाही? त्यांनीही न वाचताच या प्रबंधासंदर्भातील आपला अहवाल विद्यापीठाला दिला का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
चोरी ती चोरीच!
अतीश राठोड यांनी पीएच.डी.चा त्यांचा प्रबंध ऑक्टोबर २०१४ मध्ये सादर केला आणि ‘विदयापीठ अनुदान आयोग (उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यामूलक सत्यनिष्ठा आणि साहित्यिक चोरीच्या प्रतिबंधाला प्रोत्साहन) नियम’ २०१८ मध्ये अस्तित्वात आला असला तरी संशोधन मार्गदर्शक आणि तज्ज्ञ परीक्षकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाङ्मयचौर्याला प्रोत्साहन दिलेच कसे? वाङ्मयचौर्याबाबतचा यूजीसीचा ठोस नियम अस्तिवात नसला तरी संशोधकाने मूळ स्वरुपात संशोधन करावे आणि संशोधन मार्गदर्शकाने मूळ स्वरुपातील संशोधनालाच प्रोत्साहन द्यावे, ही नैतिक जबाबदारी दोघांचीही असल्यामुळे चोरी ती चोरीच ठरते.
किशोर धाबे यांनी राज्यशास्त्र विषयात २०१३ मध्ये पीएच.डी. प्रदान करण्यात आली होती. ‘किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासींसाठीच्या कल्याणकारी ध्येय्यधोरणांची अंमलबजावणी’ या विषयावरील पीएच.डी.च्या या प्रबंधातील ६५ टक्के वाङ्मयचौर्य असल्याचे उघड झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर २०२३ मध्ये ही पीएच.डी.च रद्द करून टाकली. ही पीएच.डी. रद्द करताना ‘विदयापीठ अनुदान आयोग (उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यामूलक सत्यनिष्ठा आणि साहित्यिक चोरीच्या प्रतिबंधाला प्रोत्साहन) नियम २०१८’ मधील तरतुदींचाच आधार घेण्यात आला. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ९४ टक्के वाङ्मयचोरीच्या प्रकरणात काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असे केले न्यूजटाऊनने संशोधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्वाधिक पीएच.डी.चे संशोधन छात्र असल्याची आकडेवारी माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केल्यानंतर पीएच.डी. पदवीसाठी होत असलेल्या संशोधनाचा दर्जा आणि गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी न्यूजटाऊनने ‘टर्निटीन’ या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या वेबटूलचा आधार घेतला. ‘टर्निटीन’ हे अग्रेसर विशिष्टता तपासणी आणि वाङ्मयचोरी प्रतिबंधक वेबटूल आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या डेटाबेसशी तुलना करून संशोधकाने सादर केलेले काम मूळ स्वरुपाचे आहे की नाही, हे या वेबटूलद्वारे पडताळून पाहता येते.
न्यूजटाऊनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील काही पीएच.डी.धारक प्राध्यापकांसह नमुना निवड पद्धतीने पीएच.डी.साठी सादर झालेल्या काही प्रबंधांची या अग्रेसर वेबटूलद्वारे पडताळणी केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी काही प्राध्यापक सध्या संशोधन मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. तर या संशोधनासाठी निवडलेल्या काही पीएच.डी. धारकांची सद्यस्थिती मात्र समजू शकलेली नाही.
अतीश राठोड यांनी पीएच.डी.साठी सादर केलेला प्रबंध वाङ्मयचौर्य तपासणीसाठी ‘टर्निटीन’कडे ६ जानेवारी २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता. ‘टर्निटीन’कडून प्राप्त झालेल्या ‘ओरिजनॅलिटी रिपोर्ट’मधून तब्बल ९४ टक्के साधर्म्य निर्देशांक प्राप्त झाला आहे. तो धक्कादायक तर आहेच शिवाय संशोधनाचा दर्जा आणि गुणवत्तेबाबतच्या चिंतेत भर घालणाराही आहे. पीएच.डी.साठी होणाऱ्या संशोधनाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढावी तसेच मूळ संशोधनाला प्रोत्साहन मिळून व्यवहार्य संशोधनाची मानसिकता विकसित व्हावी, हाच न्यूजटाऊनचा या मोहिमेमागचा हेतू आहे.