वर्धाः स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या आणि खास वऱ्हाडी भाषेत शिकवण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध असलेले आणि नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक बनलेले कराळे मास्तर उर्फ निलेश कराळे यांच्यावर वर्धा विधानसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना हल्ला करण्यात आला. मतदान केंद्रावर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे. काहीही न बोलताच भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला चढवला आणि मारहाण केली, असे कराळे मास्तरांनी म्हटले आहे.
मी माझ्या गावावरून मतदान करून आलो. त्यानंतर वर्धा मतदारसंघात फिरण्यासाठी निघालो. यावेळी कुटुंब सोबत होते. उमरी गावातून माझा नेहमीचा येण्या-जाण्याचा रस्ता आहे.तिकडे मी थांबलो. आमच्या बूथवर असलेल्या कार्यकर्त्यांशी विचारपूस केली.तेव्हा तेथे जवळच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली असे कराळे मास्तर उर्फ निलेश कराळे यांनी सांगितले.
कराळे मास्तर हे अतिशय सोप्या भाषेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या खास वऱ्हाडी भाषाशैलीमुळे ते प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांनी भाषणे वाऱ्यासारखी व्हायरल होता. मागील लोकसभा निवडणुकीत कराळे मास्तर उर्फ निलेश कराळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक बनले आहेत.
कराळे मास्तरांनी घडलेल्या प्रकाराचा सविस्तर घटनाक्रम कथन केला आहे. मी आमच्या बूथवरील कार्यकर्त्यांशी बोलत होतो.काळी वेळापूर्वीच पोलिसांची एक गाडी तेथे येऊन गेली होती. तुमच्या बूथवर दोनच खुर्च्या ठेवा, अशी सूचना मी पोलिसांना केली होती. शेजारीच असलेल्या आ. पंकज भोयर यांच्या बूथवर ८ जण बसले होते. त्यात ग्रामपंचायतीचे कर्मचारीही होते. ते कर्मचारी लॅपटॉप घेऊन बसले होते. त्यासाठीच मी पोलिसांना फोन केला. त्यावर पोलिस आम्ही तेथे येतो म्हणाले, असे कराळे मास्तरांनी सांगितले.
पत्नीलाही मारहाण, शिवीगाळ
आ. भोयर यांच्या बूथवर ग्रामपंचायतीचा कर्मचारी होता. त्याबद्दल त्याला विचारणा करण्यासाठी मी दोन पावले पुढे गेलो. तेव्हा उंबरी गावचा भाजपचा उपसरपंच सचिन खोसे माझ्या अंगावर धावून आला. तो काही न बोलताच थेट माझ्या अंगावर आला आणि त्याने मारहाण सुरू केली. माझी पत्नी दीड वर्षाच्या लेकीला घेऊन तेथेच होती. तिलाही त्यांनी शिवीगाळ केली. तिला देखील मारहाण केली. माझी दीड वर्षाची लेक पडणार होती, परंतु सुदैवाने तिला काही झाले नाही, असे कराळे मास्तरांनी म्हटले आहे. पहा व्हिडीओ