छत्रपती संभाजीनगरः महाविकास आघाडीची मराठवाड्यातील पहिलीवहिली संयुक्त वज्रमूळ सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असून या सभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण संभाजीनगर महाविकास आघाडीमय झाल्याचे पहायला मिळत आहे. सायंकाळी सात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या (एमएसएम) मैदानावर ही सभा होणार असली तरी दुपारी चार वाजेपासूनच कार्यकर्ते आणि नागरिकांचे जत्थ्ये सभास्थळाकडे येताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांची मराठवाड्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात होत आहे. या सभेसाठी तिन्ही पक्षांनी जोरदार तयार केलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या सभेला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता या सभेला सुरूवात होईल.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील या सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतरची ही महाविकास आघाडीची पहिलीच संयुक्त आणि जाहीर सभा आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वॉर्डावॉर्डात भोंगे लावून या सभेसाठी चांगला माहौल तयार केला आहे. प्रत्येक वॉर्डातून जास्तीत जास्त लोक सभेला येतील, याचे नियोजन करण्यात येत आहे. चौकाचौकात कार्यकर्त्यांचे जत्थे त्यासाठी नियोजन करत आहेत. सायंकाळी सात वाजता ही सभा होणार असली तरी दुपारी चार वाजेपासूनच कार्यकर्ते आणि नागरिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाकडे निघाले आहेत. त्यामुळे ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
कार्यकर्त्यांना ताकद देऊन वज्रमूठ आवळण्याचा प्रयत्न
आगामी महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांची एकजूट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन वज्रमूठ आवळावी, असा प्रयत्न आजच्या या सभेतून केला जाणार आहे. या सभेसाठी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांचे नेते महाविकास आघाडीच्या एकीची वज्रमूठ दाखवून देण्याचा प्रयत्न या सभेतून करणार आहेत.