मुघल हद्दपार, एनसीईआरटीच्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकात आता मगध साम्राज्यावर फोकस; पवित्र भूमी, प्रयागराज कुंभमेळ्याचाही समावेश!


नवी दिल्लीः गेल्या वर्षीपर्यंत इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकात सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मुघल साम्राज्य आणि दिल्लीच्या सल्तनतचा अभ्यास केला. पण आता तसे होणार नाही. एनसीईआरटीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार पुनर्रचना करण्यात आलेल्या नव्या पुस्तकातून हे दोन धडे वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी मगध, मौर्य, शुंग आणि सातवहनासारखी प्राचीन भारतीय साम्राज्यांचा समावेश करून ‘भारतीय संस्कृती’ची ओळख करून देण्यात आली आहे.

नव्या क्रमिक पुस्तकात उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याचे संदर्भही समाविष्ट करण्यात आले आहेत. या पुस्तकातील विविध धड्यांमध्ये ‘जनपद’ (जेथे लोकांनी वास्तव्य केले आहे), ‘सम्राज’ (सर्वोच्च शासक),  ‘अधिराजा’ (सर्वाधिपती) आणि ‘राजाधिराज’ (राजांचा राजा) अशा संस्कृत संज्ञांची जागोजागी पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नव्या पुस्तकात ग्रीकांबद्दल तपशीलवार माहिती देणारा स्वतंत्र विभाग आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार एनसीईआरटीच्या पुस्तकांची पुनर्रचना करण्यात आली असून त्याच मालिकेतील इयत्ता सातवीचे ‘एक्सप्लोरिंग सोसायटीः इंडिया अँड बियॉण्ड, भाग-१’ हे पुस्तक आहे. त्यात ‘भारतीय संस्कृतीची मुळे’ रूजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षी एनसीईआरटीने इयत्ता ३ री आणि ६ वीच्या पुस्तकांची पुनर्रचना केली होती. यंदा इयत्ता ४ थी आणि ७ वीच्या पुस्तकांच्या अद्ययावत आवृत्त्या आणल्या आहेत.

येत्या काही महिन्यातच या पुस्तकाचा दुसरा भागही आणला जाणार आहे. भाग-१ मध्ये १२ प्रकरणे आहेत. हे पुस्तक येत्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात शिकवले जाईल. या पुस्तकाच्या भाग-२ मध्ये विविध अतिरिक्त विषयांचा समावेश असण्याची शक्यता आहे. ‘द प्रिंट’ने हे वृत्त दिले आहे.

कोरोना महामारीच्या काळात अभ्यासक्रम अधिक तर्कसंगत करण्याचे कारण देत एनसीईआरटीने मुघल आणि दिल्लीच्या सल्तनतवरील भाग काटछाट करून कमी केला होता. त्यात मुघल सम्राटांच्या कामगिरीची सविस्तर माहिती देणारा दोन  पानी तक्ता आणि मामलुक, तुघलक, खिलजी आणि लोधीसारख्या राजघराण्यांचे तपशीलवार वर्णन होते. परंतु एनसीईआरटीच्या नव्या पुस्तकातून हे सर्वच संदर्भ वगळून टाकण्यात आले आहेत. नव्या पुस्तकातील कोणत्याही प्रकरणात मुघल आणि दिल्लीच्या सल्तनतचे नामोनिशाण आढळून येणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

‘जी मूल्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करू इच्छितो त्या मूल्यांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकात भारतीय संस्कृतीचे संदर्भ रूजलेले आहेत तथा हे पुस्तक वयानुसार जागतिक दृष्टिकोनाचा परिचय करून देते’, असे एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.

एनसीईआरटीच्या या नव्या पुस्तकात ‘साम्राज्यांचा उदय’ नावाचे पाचवे प्रकरण आहे. त्यात शक्तीशाली प्राचीन साम्राज असलेल्या मगध राजवंशाच्या उदयावर जाणीवपूर्वक प्रकाश टाकण्यात आला आहे. मगध साम्राज्य सध्याच्या दक्षिण बिहार व आसपासच्या परिसरात होते.

मगध साम्राज्याची विस्ताराने चर्चा करतानाच या प्रकरणात मॅसोडोनियाचा ग्रीज राजा अलेक्झांडर याने भूतकाळातील आक्रमणांचा बदला घेण्यासाठी पर्शियन साम्राज्याचा कसा पराभव केला आणि त्याच्या विजयाने ग्रीक संस्कृतीचा प्रसार करत इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक सम्राज्य कसे निर्माण केले, याचेही वर्णन या प्रकरणात आहे.

नंतर हे प्रकरण मौर्य राजवंशावर केंद्रित होत चंद्रगुप्त मौर्याच्या उदयावर प्रकाश झोत टाकते. कौटिल्याच्या कथेला स्पर्श करून सम्राट अशोकाची ओझरती चर्चा केल्यानंतर मौर्यांनी समाजासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या कामगिरीवर विस्ताराने चर्चा करते.

 या पुस्तकात ‘पुनर्रचनेचे युग (द एज ऑफ रिऑर्गनायझेशन)’ नावाचे सहावे प्रकरण आहे. या प्रकरणाची सुरूवात शुंग राजवंशाची स्थापना करणाऱ्या पुष्यमित्र शुंगापासून होते. ‘या काळात वैदिक अनुष्ठान आणि प्रथांचे पुनरूज्जीवन झाले, तरही अन्य विचारधारा भरभराटीला येत राहिल्या. तत्वज्ञान आणि साहित्यासाठी प्राधान्याची भाषा म्हणून संस्कृत भाषेचा उदय झाला’, असे या प्रकरणात म्हटले आहे.

या पुस्तकात ‘द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया- ऍन इंट्रॉडक्शन’ नावाचे भारताच्या संविधानावरील १० वे प्रकरण आहे. त्यात ‘एक काळ असा होता की लोकांना त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी नव्हती. २००४ मध्ये हे बदलले. एका नागरिकाला देशाबद्दल अभिमान व्यक्त करणे हा आपला अधिकार वाटला आणि त्याने या नियमाला न्यायालयात आव्हान दिले. राष्ट्रध्वज फडकवणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराच एक भाग आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. आता आपण तिरंग्याचाही कधीही अनादर होणार नाही हे ध्यानात ठेवून अभिमानाने तिरंगा फडकवू शकतो.’ असे या प्रकरणात म्हटले आहे.

 संविधानाचा प्रारंभिक मसुदा प्रख्यात समाजसुधारक आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केला होता. एवढाच उल्लेख या प्रकरणात आहे. मात्र संविधान लिहिण्याच्या प्रक्रियेच्या सुरूवातील संविधान सभेचे अध्यक्ष राहिलेले डॉ. सचिदानंद सिन्हा यांचे स्वतंत्र कोट उधृत करण्यात आले आहे.

याच प्रकरणात सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्षतेची व्याख्या सांगण्यात आली आहे. ‘एखाद्या व्यक्तीला आपल्या धर्माच्या विधींचे पालन करण्यासाठी राज्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, परंतु त्याचा विधीमुळे अन्य कोणत्याही व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप होता कामा नये’ अशी व्याख्या सांगण्यात आली आहे.

 या पुस्तकातील ‘हाऊ द लँड बिकम्स सॅक्रेड’ या आठव्या प्रकरणाची सुरूवातच भागवत पुराणातील एका श्लोकाने होते आणि शतकानुशतके तीर्थयात्रा व श्रद्धेमुळे भारतातील विविध ठिकाणे कशी पवित्र झाली आहेत आणि लोकांचे या भूमीशी कसे सखोल आध्यात्मिक नाते आहे, यावरही या प्रकरणात भर देण्यात आला आहे. याच प्रकरणात प्रयागराज येथील या वर्षी झालेल्या महाकुंभमेळ्याचे वर्णन आहे. या महाकुंभ मेळ्यात सुमारे ६६ कोटी तीर्थयात्रेकरू आले याचेही वर्णन आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!