जालनाः पोलिसांना दोष देऊ नका. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसवल्या, बंदुकीतून बुलेट मारायला लावल्या त्या सर्व लोकांना मराठवाड्यात बंदी करून टाका. पाऊल ठेवू देऊ नका. जोपर्यंत ते केलेल्या गोष्टीची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मराठवाड्यात बंदी घाला, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलकांना केले आहे.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आक्रमक भाषण केले. गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांसाठी जीव पणाला लावू नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. हे सगळे राजकारणी मतं पदरात पाडून घेतील आणि दुर्लक्ष करतील. हा सर्वोच्च न्यायालयातील तिढा आहे. कायद्याच्या गोष्टी समजून घ्या. हे सतत जातीचे आमिष दाखवणार. विरोधात असल्यावर आंदोलन करणार आणि विरोधातून सत्तेत आले की हेच गोळ्या झाडणार, तुम्हाला तुडवणार. जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा यांना तुमची दया येते. सत्तेत आल्यावर हेच तुम्हाला तुडवतात. या सर्व प्रकरणात पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना आदेश कोणी दिले, त्यांना दोष द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
उद्या निवडणुका आल्या की ते तुम्हाला आश्वासने द्यायला येतील. तेव्हा पाठीवरचे वळ विसरू नका. या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमवू नका, त्यांना काहीही फरक पडत नाही, आपल्यासाठी जीव महत्वाचा आहे, असेे राज ठाकरे म्हणाले.
काल फडणवीस म्हणाले की, झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नका. हे जर विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? हेच केले असते ना राजकारण? मी काही राजकारण करायला आलो नाही. ज्या पद्धतीने माता भगिनींवर लाठ्या बरसत होत्या, ते पाहून येथे आलो. येथे जरांगे-पाटलांशी चर्चा केली. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालीन. यातून काय मार्ग निघेल, माहीत नाही. पण मला या लोकांसारखे खोटे बोलता येत नाही. उगाच आमिष दाखवणे, खोटे बोलणे मला जमत नाही. या विषयात मुख्यमंत्र्यांशी बोलेन. विषय सुटण्यासारखा असेल तर निश्चित सोडवू, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्याशी जवळपास २० मिनिटे चर्चा केली. संयुक्त महाराष्ट्र होत असताना वर्षभरानंतर मराठवाडा संस्थान महाराष्ट्रात सामील झाले. त्यावेळी आम्हाला निजाम कालीन आरक्षण होते. ते आरक्षण आम्हाला पुन्हा लागू करा. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी राज ठाकरे यांना सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या लक्षात विषय आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो, काही तज्ज्ञांशीही बोलतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.