नाशिक/छत्रपती संभाजीनगरः पाकिस्तानी बॉयफ्रेंडसोबत सौदी अरेबियाला पळून गेलेली आणि नऊ महिन्यांनंतर भारतात परत आलेली छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) सिडको भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची पत्नी चार मुलांची आई असून दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि स्थानिक पोलिसांनी सध्या ती वास्तव्यास असलेल्या मालेगावमध्ये कसून चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनीही चौकशी सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात राहणारी विवाहिता डिसेंबर २०२२ मध्ये तिच्या वडिलांसोबत सौदी अरेबियाला गेली होती. तेथे तिची एका पाकिस्तानी तरूणाशी ओळख झाली. वडिलांसोबत भारतात परतल्यानंतरही ही ३४ वर्षीय विवाहित महिला त्या पाकिस्तानी तरूणाच्या संपर्कात राहिली. तिची आणि त्याची जवळीक वाढल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये ती पाकिस्तानी बॉयफ्रेंडकडे सौदी अरेबियाला पळून गेली.
मूळची मालेगावची असलेल्या या महिलेचे २०११ मध्ये छत्रपती संभाजीनगरातील एका व्यावसायिकाशी लग्न झाले होते. त्याचा छत्रपती संभाजीनगरात एक पेट्रोलपंपही आहे. ही ३४ वर्षीय विवाहित महिला चार मुलांची आई आहे.
सौदी अरेबियाला पाकिस्तानी बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्यानंतर तेथे तिने त्याच्याशी लग्न केले. जानेवारी २०२३ मध्ये तिने स्वतःच छत्रपती संभाजीनगरमध्ये रहात असलेल्या आपल्या मूळ पतीला कॉल करून ही माहिती दिली आणि लग्नाचे फोटोही पाठवले होते.
ही महिला तब्बल नऊ महिन्यानंतर, ३ ऑगस्ट रोजी सौदी अरेबियातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. तेथून छत्रपती संभाजीनगरला येण्याऐवजी ती मालेगावला आपल्या आईवडिलांकडे गेली. मालेगावच्या आयेशानगर भागात तिचे आईवडिल राहतात.
ही ३४ वर्षीय विवाहिता भारतात परतल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी स्थानिक पोलिसांसह मुंबई एअरपोर्ट लिमिटेड, सीआयएसएफ आणि नागरी वाहतूक महासंचालकांना एक ईमेल आला. ही ३४ वर्षीय महिला दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेली असून ती देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असण्याची शक्यता या ईमेलमध्ये वर्तवण्यात आली.
हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर तपास यंत्रणा खडबडून जागा झाल्या. हा ईमेल आल्यानंतर मालेगाव पोलिसांबरोबरच एटीएसच्या पथकानेही तिची चौकशी केली. दरम्यान, या ३४ वर्षीय महिलेचे आईवडिल गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची माहितीही समोर येत आहे.
दुसरीकडे एटीएसच्या पथक छत्रपती संभाजीनगरात या महिलेचा मूळ व्यावसायिक पतीचीही चौकशी करत आहे. गुप्तचर यंत्रणांचे अधिकारीही त्यांच्याकडून माहिती गोळा करत आहेत. सौदी अरेबियाला गेल्यानंतर ही महिला काही दिवस लिबियामध्येही वास्तव्यास होती, अशी माहितीही समोर येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा तिची ट्रॅव्हल हिस्ट्रीही तपासत आहेत.
‘त्या’ ईमेलचीही चौकशी सुरू
तपास यंत्रणांना प्राप्त झालेल्या ईमेलचीही चौकशी केली जात आहे. हा ईमेल कदाचित खोडसाळपणाने केला गेला असू शकतो, अशी शक्यताही नाकारता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत पोलिस आणि एटीएस तपास करत आहोत. त्याबद्दल नेमके आताच काही सांगता येणार नाही. गोपनीयता राखण्यासाठी आम्ही फक्त तपास करत आहोत. लवकरच या घटनेचा संपूर्ण पर्दाफाश होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.