वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी मार्डची बोलणी फिस्कटली, लेखी आश्वासन मिळेपर्यंत निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच राहणार


मुंबईः फलटण येथील शासकीय रूग्णालयातील महिला डॉक्टर डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करावी आणि न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे बाह्यरूग्ण विभागातील रुग्णसेवा विस्कळित झाली असून या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डशी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची बोलणी फिस्कटली. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे सेंट्रल मार्डने जाहीर केले आहे.

सोमवारपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर फलटणच्या महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने निष्पक्ष चौकशी सुरु करावी आणि त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी दररोज मेणबत्ती पेटवून आणि काळ्या फिती लावून आपला संताप व्यक्त करत आहेत. या मागणीसाठी सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्डच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टरांचे हे बेमुदत आंदोलन सुरू आहे.

केंद्रीय मार्ड ने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सेन्ट्रल मार्डचे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके, डॉ. कुणाल गोयल आणि डॉ. महेश गुरव उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी निवासी डॉक्टरांचे विषय, मागण्या आणि मांडलेल्या मुद्द्यांकडे लक्षपूर्वक ऐकून घेतले. या आंदोलनामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेला संप मागे घ्यावा. तसेच राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्याने चर्चा करीत असून तातडीने पुढील पावले उचलली जात असल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करत मुख्यमंत्र्यांसोबत मार्डच्या मागण्यांवर लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, सेन्ट्रल मार्डच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारकडून अधिकृत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. राज्य सरकार व मार्ड यांच्यातील पुढील चर्चेनंतर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!