छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठवाडा साहित्य परिषदेच्या(मसाप) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज (शनिवारी) जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातील ‘संस्थावर्धक पॅनल’ने आरएसएस-भाजप पुरस्कृत ‘परिवर्तन मंच’ पॅनलचा दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे परिवर्तन मंच या पॅनलकडून उभ्या राहिलेल्या आणि नंतर निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर करूनही निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिलेल्या ‘विद्रोही’ कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांना केवळ १९५ मतांसह लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.
निर्वाचन अधिकारी डॉ. राम चव्हाण यांच्यासह ५० कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात केली. ‘मसाप’चे एकूण मतदार तीन हजार ७० असून त्यापैकी दोन हजार ५३० मतदारांनी मतदान केले. त्यातील २ हजार ५०४ मते वैध ठरली तर २६ मते अवैध ठरली. टपालाने पाठवलेल्या पण पत्ता न सापडल्याने १९४ मतपत्रिका उलट टपाली परत आल्या होत्या, असे डॉ. चव्हाण यांनी जाहीर केले.
मसापच्या निवडणुकीतील मतदानाच्या मतमोजणीच्या एकूण ६ फेऱ्या करण्यात आल्या. या निवडणुकीत ‘संस्थावर्धक पॅनल’चे प्रमुख कौतिकराव ठाले पाटील यांना २ हजार ३७० मते मिळाली तर आरएसएस-भाजप पुरस्कृत परिवर्तन मंचचे पॅनल प्रमुख डॉ. सर्जेराव जिगे यांना केवळ २१७ मते मिळाली. डॉ. जिगे यांनी आरएसएस-भाजपची यंत्रणा वापरून मसापवर ताबा मिळवण्याचे जोरकस प्रयत्न केले. परंतु त्यांनाच तीनशे मतांचाही आकडा पार करता आला नाही, त्यामुळे ते पराभूत झाले.
या निवडणुकीत आरएसएस-भाजप पुरस्कृत परिवर्तन मंचच्या झेंड्याखाली प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे आणि आंबेडकरी कवि-लेखक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांच्यासह अन्य दोन उमेदवार उभे राहिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. न्यूजटाऊनने ‘मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या ‘दांड्या’वर परिवर्तन मंचचा ‘झेंडा’, आंबेडकरवाद्यांचा ‘विद्रोह’ही संघाच्या दावणीला?’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा झाली. प्रारंभी डॉ. प्रतिभा अहिरे यांनी माझी उमेदवारी कशी महत्वाची आहे, हे पटवून देणारी भूमिका न्यूजटाऊनकडे माडंली.
त्यावर न्यूजटाऊनने प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे न देता मसापच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. परंतु त्यानंतरही त्या निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिल्या. त्यांच्या पॅनलचे प्रमुख डॉ. सर्जेराव जिगे यांनीही प्रतिभा अहिरे आमच्या सोबतच आहेत, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले आणि आज निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या भूमिकेवर मसापच्या मतदारांनी नाराजीच्या मोहोर उठवत त्यांना केवळ १७५ मते देत त्यांना हवे असलेले आरएसएस-भाजप पुरस्कृत ‘परिवर्तन’ धुडकावून लावले.
या निवडणुकीत आरएसएस-भाजप पुरस्कृत परिवर्तन मंचचा झेंडा खांद्यावर घेतलेले आणखी एक परिचित आंबेडकरी कवि- लेखक आणि नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख डॉ. सिद्धोधन कांबळे यांनीही ‘परिवर्तन’चा झेंडा खांद्यावर घेतल्याचे जोरदार समर्थन केले. त्यांनाही मसापच्या मतदारांनी पराभवाची धूळ चारली. त्यांना केवळ १६९ मते मिळाली.
कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते?
संस्थासंवर्धक पॅनल | परिवर्तन मंच पॅनल | ||
उमेदवार | मिळालेली मते | उमेदवार | मिळालेली मते |
ऋषीकेश कांबळे | २,३७६ | डॉ. सर्जेराव जिगे | २१७ |
आसाराम लोमटे | २,३७३ | डॉ. मोहन सौंदर्य | १५७ |
कौतिकराव ठाले पाटील | २,३७० | ||
देविदास फुलारी | २,३६४ | डॉ.शिवाजी हुसे | २११ |
के.एस. अतकरे | २,३६३ | सुभाष बागल | १७६ |
दीपा क्षीरसागर | २,३५९ | दिलीप पाठक नारीकर | १५३ |
संजीवनी तडेगावकर | २,३५७ | ब्रह्माजी केंद्रे | १४५ |
दादा गोरे | २,३४२ | अशोक शेवगण | १५४ |
दगडू लोमटे | २,३४२ | सिद्धोधन कांबळे | १६९ |
संतोष तांबे | २,३३८ | डॉ. प्रतिभा अहिरे | १९५ |
सुभाष कोळकर | २,३३५ | नवनाथ गोरे | १९० |
रामचंद्र काळुंखे | २,३३३ | सुनील डोके | १५४ |
सरोज देशपांडे | २,३३० | युवराज नळे | १५१ |
गणेश मोहिते | २,३३० | भारत सातपुते | २०४ |
किरण सगर | २,३२० | सत्यशिला तौर | २०८ |
नितीन तावडे | २,३१८ | बबन मोरे | १४३ |
जयद्रथ जाधव | २,३१७ | ||
रामचंद्र तिरुके | २,३१५ | ||
हेमलता पाटील-हिंगमिरे | २,३१५ | ||
अनंत कराड | २,३१२ | ||
संजीव कुलकर्णी | २,३१० | ||
नामदेव वाबळे | २,२६९ |
डॉ. ऋषीकेश कांबळेंना सर्वाधिक मते
मसाप संस्था संवर्धक पॅनलचे उमेदवार डॉ. ऋषीकेश कांबळे यांना या निवडणुकीत सर्वाधिक २ हजार ३७६ मते मिळाली. त्यांच्या खालोखाल आसाराम लोमटे यांना २ हजार ३७३ मते मिळाली तर संस्था संवर्धक पॅनलचे प्रमुख कौतिकराव ठाले पाटील यांना २ हजार ३७० म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. याचाच अर्थ मसापच्या मतदारांना मसापवर संस्थासंवर्धक पॅनलची सत्ता हवी आहे, परंतु मसापचे नेतृत्व दुसऱ्याकडे सोपवणे आवश्यक आहे, हेच मतदारांनी दिलेल्या कौलातून स्पष्ट होत आहे.
विजयी पॅनलच्या उमेदवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच गुलाल उधळून आणि पेढे वाटून जल्लोष केला. दरम्यान, मतपत्रिका आणि यादीतील मतदार यांचा हिशेब जुळवून घ्यावा, अशी मागणी ‘परिवर्तन मंच’ने केली. मात्र, या आक्षेपासाठी विहित मुदतीत दाद मागणे अपेक्षित होते. ऐनवेळी ही प्रक्रिया राबविणे शक्य नसल्याचे निर्वाचन अधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले. या गोंधळामुळे काही वेळ निकाल घोषित करण्याचे काम ठप्प झाले होते.
विजयानंतर ठाले पाटील म्हणाले…
मराठवाडा साहित्य परिषदेने जाहीर केलेले महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. आगामी पाच वर्षांत मराठवाड्यातील मराठी साहित्याचा इतिहास आणि मराठवाडी शब्दांच्या नोंदीचा संग्रह हे दोन वाड्मयीन प्रकल्प पूर्ण केले जातील. तसेच ‘मसाप’ची नवीन इमारत वर्षभरात पूर्ण होईल. त्यात नवीन सभागृह असेल. ‘प्रतिष्ठान’ मासिक नियमित प्रकाशित करुन अधिकाधिक वाचकांपर्यंत छापील आणि डिजिटल स्वरुपात पोहचवले जाईल, असे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.