गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीच्या काचा फोडल्या, मराठा आंदोलकांचा हल्लाबोल; सदावर्ते म्हणालेः जरांगेंच्या मुसक्या बांधा!


मुंबईः कायम वादग्रस्त आणि टोकाची भूमिका घेतल्यामुळे चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गुणरत्न सदावर्ते यांचा मराठा आंदोलनाला असलेला विरोध आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची केलेली मागणी त्यामुळे सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाजात रोष होता. त्या रोषातूनच गुरूवारी सकाळी काही आंदोलकांनी सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

गुणरत्न सदावर्ते हे मुंबईच्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या १६ मजली इमरतीत राहतात. तेथे सदावर्ते यांची अलिशान गाडी पार्क केलेली असताना अज्ञातांनी या गाडीच्या एका बाजूच्या सर्व काचा फोडल्या. सदावर्ते यांच्या मालकीची आणखी एक गाडीही फोडण्यात आली आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. या प्रकरणी मंगेश साबवे, वसंत बनसोडे आणि राजू सावे अशा तिघांना अटक केली आहे. हे तिघेही छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडताना या आरोपींनी एक मराठा, लाख मराठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्याची माहिती भोईवाडा पोलिसांकडून देण्यात आली. अटक केलेल्यांचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते, त्यांनी फडणवीसांनी समज द्यावी, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. जरांगे यांच्या टिकेला गुणरत्न सदावर्ते यांनीही उत्तर दिले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला झालेली गर्दी म्हणजे निव्वळ जत्रा होती, अशी बोटरी टीका करतानाच अरेरावी, मग्रुरीचीच भाषा, स्वतःला पाटील म्हणूवून घेणे ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही मागास नसता तेव्हा तुम्ही मागासलेपणाच्या आरक्षणाला पात्र नसता. महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेपणात येत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळणारच नाही, असे सदावर्ते म्हणाले होते. त्यामुळे सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाजात रोष होता.

हल्ल्यानंतर सदावर्तेंचा संताप, म्हणालेः जरांगेंच्या मुसक्या…

या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. मी हल्लेखोरांना आणि मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारू इच्छितो की, हीच तुमची शांततापूर्ण मराठा आंदोलनाची व्याख्या आहे का?  अशा प्रकारचे हल्ले करून मला शांत करता येणार नाही. सामान्यांच्या ५० टक्के जागांचे आरक्षण वाचवण्यासाठीचा माझा लढा आहे. या हल्ल्याला जबाबदार धरून मनोज जरांगे यांना अटक करा, त्यांच्या मुसक्या बांधा, असे सदावर्ते म्हणाले.

माझ्या कष्टाच्या आणि घामाच्या कमाईचे त्यांनी नुकसान केले. त्यांनी यापूर्वी ३२ कर्मचाऱ्यांना विनाकारण मारहाण केली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई झाली. मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. माझी मुलगी झेन मागील ८ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण झेन आणि जयश्री पाटील यांना मारण्याच्या आणि उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे सदावर्ते म्हणाले.

माझ्यावर हल्ला होईल, हे पोलिसांनाही माहीत होते. त्यांनी पोलिसांसमक्ष हल्ला केला, गाडीच्या काचा फोडल्या. ते माझ्या घरात येण्याचाही प्रयत्न करत होते, असे मला पोलिसांनी सांगितल्याचे सदावर्ते म्हणाले.

मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणालेः दुसऱ्या कुणीतरी…

या सर्व प्रकारावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून प्रतिक्रिया दिली आहे. कुणाच्या गाड्या वगैरे फोडल्या मला माहीत नाही. पण तसे काही घडले असेल तर आपण त्याचे समर्थन करत नाही. कारण माझा मराठा समाज शांतताप्रिय आहे. शांततेत आंदोलन करत आहेत. शांततेतच करत राहील. दुसऱ्या कुणीतरी हे केले असेल. पण जर हे असे काही घडले असेल तर त्या हल्ल्याचे आपण समर्थन करत नाही, असे जरांगे म्हणाले.

आमचा समाज शांततेच आहे. सगळे मराठा समाजाच्या विरोधात जात आहेत. या समाजाचे वाटोळे व्हावे यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. आमच्या जातीच्या पोरांचे आयुष्य उद्धवस्त व्हावे, यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. तरीही आम्ही शांत आहोत. आंदोलन शांतेत चालू आहे, शांततेत चालू राहील. कुठेही उद्रेक करण्याचा मराठा समाजाचा उद्देश नाही, असे जरांगे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!