शिंदेंसोबतचे आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार? भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, ‘मातोश्री’ची क्षमा मागून करणार घरवापसी?


मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे. शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार अस्वस्थ असून त्याच अस्वस्थेतून शिवसेनेचे हे बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंची साथ सोडून पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा भाजपचे बडे नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तर दुसरीकडे अतिरेकानंतर स्फोट होणारच, असे वक्तव्य शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी पहाण्यास मिळण्याची शक्यता बळावली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार निधी देत नाहीत. शिवसेनेच्या आमदारांना सापत्न वागणूक देतात. मुख्यमंत्री आमचा असूनही काहीच उपयोग नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदार आणि मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळतो, असे टिकास्त्र सोडत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले.

या सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच भाजपने अजित पवार यांना गळाला लावून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आणि अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या अन्य आठ आमदारांना लगेचच मंत्रिपदेही दिली. त्यामुळे आज ना उद्या मंत्रिपद मिळेल, अशी आस लावून बसलेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अस्वस्थ झाले आहेत.

 शिवसेनेच्या आमदारांच्या या अस्वस्थतेची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीवर भाष्य करताना शिवसेनेचे बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जावू शकतात, असा दावा केला आहे.

‘मी मुंबईत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंकडे परतू शकतात ऐकायला मिळत आहे. मोदी आता राष्ट्रवादी काँग्रेसला महत्व देत आहेत आणि आपला वापर करून झाल्यावर आपल्याला साईडलाइन करत आहेत, अशी भावना या बंडखोरांमध्ये झाली आहे,’ असे ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

‘मातोश्री’ची क्षमा मागून करणार घरवापसी?

  भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शिंदे गटातील आमदारांच्या घरवापसीचा दावा केलेला असतनाच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही असाच दावा केला आहे. अजितदादा आणि कंपनीने तिकडे उडी मारली त्याच दिवशी शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरीच्या हालचाली सुरू केल्या. आमदारांचा हा उद्रेक थांबवताना एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक आमदार म्हणत आहेत, आम्ही ज्या घरात होतो, तिथेच बरे आहोत. मातोश्रीने आम्हाला साद घातली तर आम्ही नक्की त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे वक्तव्य एका मंत्र्याने केले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातून निरोप येत आहेत. येथील आमदारांमध्ये आपण होतो, तिथेच बरे होतो, अशी चर्चा रंगली आहे. मातोश्रीची क्षमा मागून परत जावे का? याबद्दल संबंधित आमदारांमध्ये विचारविनियम सुरू असल्याची माहिती आम्हाला समजल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

...अतिरेकानंतर स्फोट होईलचः आ. बच्चू कडू

शिंदे-फडणवीस सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीवर प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ते आल्यामुळे शिंदे गटातील आमदारांची अडचण झाली आहे. आम्हाला विचारात आणि विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतले. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या सर्व आमदारांची अडचण झाली आहे. अतिरेकानंतर स्फोट होईल, असे बच्चू कडू म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा त्रास होता. काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदारसंघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप होता. मात्र, त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. ज्यांनी हा उठाव केला, त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचे आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असे होऊ नये, याची आम्हाला अपेक्षा आङे, असे बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शिवसेनेच्या दोन आमदारांत आधी हमरीतुमरी नंतर झटापट

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्याच्या अस्वस्थतेतूनच शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये मंगळवारी सायंकाळी आधी बाचाबाची आणि नंतर झटापट झाली. दोन आमदार परस्परांशी भिडल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा नागपूर दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी मुंबईला परतले होते, अशी माहिती आता समोर येत आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मंगळवारी वर्षावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतच त्याचे पडसाद उमटले. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यांच्यात झटापटही झाली. आमदारांच्या या वादाची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतले. त्यांच्या उपस्थितीत आमदारांची समजूत काढण्यात आली. आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न बुधवारी रात्रीपर्यंत सुरू होते,अशी माहिती आता समोर येत आहे. परंतु शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी याचा इन्कार केला आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्ये कोणताही वाद, बाचाबाची झाली नाही. या चर्चा कपोलकल्पित आहेत. त्यात तथ्य नाही, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!