मुंबईः नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. एकनाथ खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण आहे. त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी घरवापसीची ऑफर दिली आहे. तावडे यांनी दिलेल्या या घरवापरसीच्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत.
विनोद तावडे यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांना ही जाहीर ऑफर दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘त्यांच्यासारख्या नेत्या ज्येष्ठ लोकांनी येणं… पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात, तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसे पक्षात आली पाहिजे असे आम्हाला वाटते, त्यात नाथाभाऊ आहेत,’ असे तावडे म्हणाले.
एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल, तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करन उचित निर्णय घेतील. पण खडसे यांना भाजपच्या शिस्तीचे पालन करावेच लागेल. परंतु माझे एकनाथ खडसे किंवा पक्षश्रेष्ठींशी बोलणे झालेले नाही किंवा त्यांना तसा प्रस्तावही दिलेला नाही, असे तावडे म्हणाले.
राज्यात भाजपची सत्ता येईपर्यंत म्हणजे २०१४ पर्यंत एकनाथ खडसे हेच महाराष्ट्रात भाजपचा प्रमुख चेहरा होते. भाजपने विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, अशी अटकळ बांधली जात होती. कारण खडसे हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खडसेंच्या तुलनेत अगदीच नवख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले. तेव्हापासून खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद सुरू झाले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर झाले होते. त्यामुळे खडसेंना मंत्रिपदही सोडावे लागले होते. त्यानंतर खडसे भाजपमध्ये बाजूला सारले गेले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
खडसेंनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप केले. तिखट शब्दांत टिकास्त्र सोडले. या सगळ्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी खडसेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसीची ऑफर दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता एकनाथ खडसे या ऑफरला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.