मुंबई: शासकीय नोकर भरतीमध्ये महिलांकरिता ३० टक्के आरक्षण आहे. या पदभरतीमध्ये महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेवून महिला व बालविकास विभागाकडून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी महिला आरक्षणासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनुसार चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत लोढा बोलत होते. यावेळी आमदार डॉ.भारती लव्हेकर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
महिला व बालविकास विभागाकडून महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू नये याबाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महिला व बालविकास विभागाने ही कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.