मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. पुसदमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार इंद्रनील नाईकांच्या विरोधात शरद मैंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही चौथी यादी जाहीर केली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. सलील देशमुख हे आजच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. परंतु कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे त्यांना पोहोचायला दोनच मिनिटे उशीर झाल्यामुळे ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाहीत. ते आता उद्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नाईकांचा गड समजल्या जाणाऱ्या पुसद विधानसभा मतदारसंघातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान आमदार इंद्रनील नाईकांच्या विरोधात शरद मैंद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. शरद मैंद हे पुसद अर्बन बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते सलग पाचवेळा या बँकेचे अध्यक्ष आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ७ उमेदवार
- माणः प्रभाकरह घार्गे
- काटोलः सलील देशमुख
- खानापूरः वैभव पाटील
- वाईः अरूणादेवी पिसाळ
- दौंडः रमेश थोरात
- पुसदः शरद मैंद
- सिंदखेडाः संदीप बेडसे