मुंबईः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून मोठे राजकीय वादंग उठले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजप आणि महायुतीवर टिकेची झोड उठवली असतानाच आता या मुद्द्यावरून खुद्द महायुतीमध्येच जुंपल्याचे चित्र आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे दोन प्रमुख नेतेच या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. महायुतीतील या बेबनावाचा फायदा उचलण्याचा महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे.
योगी आदित्यनाथ यांनी दिलेला बटेंगे तो कटेंगे हा नारा खुद्द महायुतीतील नेत्यांनाच आवडलेला नाही. महाराष्ट्रातील मतांचे धुव्रीकरण करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी दिलेला हा नारा महाराष्ट्रात आवश्यक नाही, या नाऱ्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे भाजप नेते पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांनी जाहीर करून टाकले आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही महाराष्ट्रात हा नारा चालणार नाही, असे स्पष्ट केले होते.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कटेंगे तो बटेंगे हा नारा उचलून धरला आहे. मोदींनी दिलेला एक है तो सेफ हा नारा तर महामंत्रच असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र अजित पवार या घोषणांच्या विरोधात आहेत. या लोकांना (अजित पवार, पंकजा मुंडे) जनतेच्या भावना समजलेल्या नसतील, असे म्हणत फडणवीसांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टिकास्त्र सोडले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
केवळ अजित पवारांबद्दलच बोलायचे झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत आले आहेत. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचे ते सांगत आले आहेत. परंतु त्यांचे धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असल्यासारखे आहे. हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारसरणी असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून कधी कधी स्युडो सेक्युलॅरिझम बाहेर येतो. जनतेचा मिजाज (कल) राष्ट्रवादी मिजाज समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल, आम्ही त्यांना समजावून सांगू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही. ते तिकडे उत्तरेकडेच चालवायचे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इतर राज्यांची महाराष्ट्राशी तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेने कायम सलोखा ठेवला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात आणि त्यांचा विचार बोलून जातात. मात्र महाराष्ट्राने हा विचार मान्य केलेला नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगेबाबत मांडलेली वेगवेगळी भूमिका पाहता या नाऱ्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच जुंपली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे मतांचे धुव्रीकरण होऊन त्याचा फटका आपल्याच उमेदवारांना बसेल, अशी भीती अजित पवारांना वाटत आहे. महाविकास आघाडीचे नेते मात्र प्रचारसभांमधून बटेंगे तो कटेंगेचा जोरदार फायदा घेत भाजप व महायुतीला बेनकाब करण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीतील या बेबनावाचा मविआ फायदा उचलण्याची शक्यता आहे.