छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महायुती आणि महाविकास आघाडीची जागांची समीकरणे जुळवताना उसळलेल्या नाराजीचे रंग सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीनंतरही कायम राहिले. उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्यांनी पक्षश्रेष्ठी किंवा नेते मंडळींच्या मनधरणीलाही दाद दिली नाही. मराठवाड्यात सर्वच पक्षात बंडखोरांनी बंडाचे झेंडे कायम ठेवले. बंडखोरांमुळे बसणाऱ्या संभाव्य फटक्याचा अंदाज आता सर्वच राजकीय पक्षांना घ्यावा लागणार आहे.
मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अर्ज भरणाऱ्यांनी दिवाळीनंतर एका दिवसातच अर्ज माघारीही घेतले. मात्र बंडखोरांनी अर्ज कायम ठेवले. घनसावंगीमधून शिवाजी चोथे, बीडमध्ये ज्योती मेटे, आष्टीमध्ये भीमराव धोंडे या बंडखोरांनीही आपले अर्ज कायम ठेवले. नांदेडमध्ये महायुतीत बंडखोरी झाली. लातूर आणि धाराशीवमध्ये (उस्मानाबाद) बंडखोरांना शमवण्यात नेत्यांना यश आले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. त्यांच्याकडे असंख्य उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारी अर्ज भरा, निवडणूक लढवायची की नाही, हे ४ नोव्हेंबरला ठरवू, असे जरांगे यांनी सांगितल्यामुळे अनेक मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. जरांगेंच्या ताकदीवर बंडखोरी करू, असा काही जणांचा मनसुबा होता, परंतु जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या भरवश्यावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बहुतेकांनी अर्ज मागे घेतले.
आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आष्टीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रताप आजबे आणि भाजपचे सुरेश धस या दोघांनाही अधिकृत एबी फॉर्म देण्यात आले आहेत. घनसावंगीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते शिवाजीराव चोथे यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अधिकृत उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध त्यांनी बंडखोरी केली.
अशी झाली बंडखोरी
मतदारसंघ | बंडखोर उमेदवार | कोणाविरुद्ध बंडखोरी? |
नांदेड उत्तर | मिलिंद देशमुख (भाजप) | बालाजी कल्याणकर (शिंदेसेना) |
नांदेड दक्षिण | दिलीप कंदकुर्ते (भाजप) | आनंद बोंढारकर (शिंदेसेना) |
मुखेड | बालाजी खतगावकर (शिंदेसेना) | डॉ. तुषार राठोड (भाजप) |
हिंगोली | भाऊराव गोरेगावकर (काँग्रेस) रामदास पाटील (भाजप) | रुपाली गोरेगावकर (ठाकरेसेना) तान्हाजी मुटकुळे (भाजप) |
कळमनुरी | अजित मगर (ठाकरेसेना) | संतोष टारफे (ठाकरेसेना) |
बीड | डॉ. ज्योती मेटे (राकाँ-शप) अनिल जगताप (शिंदेसेना) | संदीप क्षीरसागर (राकाँ-शप) योगेश क्षीरसागर (राकाँ-अप) |
आष्टी | भिमराव धोंडे (भाजप) | सुरेश धस (भाजप) बाळासाहेब आजबे (राकाँ-अप) |
गेवराई | लक्ष्मण पवार (भाजप) | विजयसिंह पंडित (राकाँ-अप) |
माजलगाव | रमेश आडसकर (राकाँ-शप) बाबरी मुंडे (भाजप) | मोहन जगताप (राकाँ-शप) प्रकाश सोळंके (राकाँ-अप) |
पाथरी | बाबाजानी दुर्राणी (राकाँ-शप) माधवराव फड (भाजप) | सुरेश वरपूडकर (काँग्रेस) राजेश विटेकर (राकाँ-अप) |
अहमदपूर | गणेश हाके (जस्वप) | बाळासाहेब पाटील (राकाँ-अप) |
औरंगाबाद मध्य | बंडू ओक (ठाकरेसेना) | बाळासाहेब थोरात (ठाकरेसेना) |
फुलंब्री | रमेश पवार (शिंदेसेना) | अनुराधा चव्हाण (भाजप) |
गंगापूर | प्रा. सुरेश सोनवणे (भाजप) | प्रशांत बंब (भाजप) |
वैजापूर | एकनाथ जाधव (भाजप) | रमेश बोरनारे (शिंदेसेना) |
सिल्लोड | दादाराव आळणे (भाजप) | अब्दुल सत्तार (शिंदेसेना) |