मराठे निवडणूक लढणार नाहीत, मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार; भुजबळ म्हणाले…


जालनाः एका जातीवर निवडणूक लढणे शक्य नाही आणि मित्रपक्षांची यादी येणार होती, तीही आलेली नाही, त्यामुळे आपण थांबलेलं बरं, असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून आज माघार घेतली आहे. दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घ्या, असे आवाहनही त्यांनी उमेदवारांना केले आहे.

आम्ही मित्रपक्षांसोबत चर्चा करत होतो. लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी आलेली नाही. तर लढायचे कसे?  एका जातीवर निवडणूक लढावायची का? तर असे ठरले की, एका जातीवर कोणी निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढावायची नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण सांगत नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आले तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर एकटा लढला तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढेच सांगेन की कुणाला पाडायचे त्याला पाडा आणि निवडून आणायचे त्याला आणा. मात्र ज्याला निवडून आणायचे आहे, त्याच्याकडून लेखी घ्या. व्हिडीओही काढून घ्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आंदोलनात हजार-पाचशे लोकांवर चालून जाते, पण…

एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही, माझे एवढे राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावे लागले. राजकीय प्रक्रिया हाताळणे ही साधी गोष्ट नाही. मी तर राजकीय प्रक्रियेत लेकरू आहे. आंदोलनात हजार-पाचशे लोक असले तरी चालून जाते, मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागले, असे जरांगे म्हणाले.

अर्ज मागे घ्या, फसगत होईल

मराठा बांधवांना सांगतो की, आपले अर्ज मागे घ्या. आपला काही खानदानी धंदा नाही. आपली फसगत होईल. त्यामुळे सर्व मागे घ्या. एकही अर्ज ठेवू नका. निवडणूक संपली की आपले आंदोलन सुरू करू. आपल्या जातीसाठी लढू. याला पाड, त्याला पाड असे म्हणायची माझी इच्छा नाही. जिंकून कोणी तिसराच येणार. कोणीच आपल्या कामाचे नाही, असेही जरांगे म्हणाले.

कोणालाही पाठिंबा नाही

महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. कुणीही दबाव टाकला तर मी त्याच्या घरी जाऊन डोक्यात दगड घालेन. आम्ही तीन ते चार महिने अभ्यास केला. महायुती असो की महाविकास आघाडी असो दोन्ही सारखेच आहेत. मी मनोज जरांगे एकटा नाही तर मी म्हणजे आमचा पूर्ण समाज आहे. मला कोणाच्याही प्रचाराला जायचे नाही. आमचा कोणत्याही पक्षाला, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

देर आए, दुरूस्त आएः भुजबळ

मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी जो निर्णय जाहीर केला आहे, त्याचे मी स्वागत करतो. या निर्णयानंतर देर आए, दुरूस्त आए, असे आपल्याला म्हणता येईल. एकप्रकारे मनोज जरांगे यांचे म्हणणे योग्यच आहे की, एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाचे बांधव मोकळेपणाने मतदान करतील. सर्व पक्षातून जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी ६० ते ७० टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय योग्य आहे, असे भुजबळ म्हणाले.

संबंधित बातम्या