भाजपचे पीक वाढत आहे, किटकनाशकांची फवारणी गरजेचीः नितीन गडकरींकडून भाजपला घरचा आहेर


मुंबईः ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपची तुलना ‘रोग पडलेल्या पीका’शी केली असून पक्षाला शुद्ध करण्यासाठी ‘किटकनाशकांची फवारणी’ करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

‘मुंबई तक’शी बोलताना नितीन गडकरी यांनी भाजपमधील ‘दागी’ नेत्यांच्या वाढत्या घुसखोरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सत्ताधारी भाजपची सातत्याने महत्वपूर्ण गतीने वाढ होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

भाजपचा झपाट्याने होत असलेल्या विस्ताराचा उल्लेख करत नितीन गडकरी म्हणाले की, जसे जसे पीक वाढते, रोगही वाढत जातात. भाजपकडे खूप सारे पीक आहे, जे चांगले अन्नधान्य आणि आजारही घेऊन येते. त्यामुळे आम्हाला अशा रोगग्रस्त पीकांवर किटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे.

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नवीन लोक वेगवेगळ्या कारणांनी पक्षात येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे, विचारसरणी शिकवणे आणि आपला कार्यकर्ता बनवणे ही आमची जबाबदारी आहे. आमचे प्रयत्न सुरू आहेत. एक हजार कार्यकर्ते उभे राहतात, परंतु कधी कधी एखादा कार्यकर्ता काही तरी म्हणतो आणि त्या हजार कार्यकर्त्यांचे काम व्यर्थ होऊन जाते, असेही गडकरी म्हणाले.

महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच नितीन गडकरी यांनी ही विधाने केली आहेत. या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुकीला सामोरा जात आहे. परंतु तिकिट वाटप आणि नेत्यांच्या महत्वाकांक्षांवरून भाजप अंतर्गत बंडाळी पहायला मिळाली आहे. भाजपमध्ये काही नेत्यांनी नुकताच प्रवेश केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

भारतीय संविधानामध्ये निहित धर्मनिरपक्षेतेच्या तत्वावर जोर देत नितीन गडकरी म्हणाले की, सरकार आणि प्रशासनाने धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एक व्यक्ती कधीही धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. परंतु राज्य, सरकार आणि प्रशासनाला धर्मनिरपेक्षच असावे लागेल.

आमच्या देशात मतभेद ही काही समस्या नाही, तर विचारांची कमी हीच खरी समस्या आहे, असे सांगतानाच गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात माझी कोणतीही भूमिका नाही. राज्यातील नेते सक्षम आहेत आणि सध्या त्यांना माझ्या भागीदारीची आवश्यकता नाही. परंतु जेव्हा त्यांना माझी आवश्यकता भासेल, तेव्हा जरूर मदत करेन.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!