मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आचार संहिता लागू झाल्यानंतरच्या अवघ्या चारच दिवसांत आचारसंहिता भंगाच्या तब्बल ४२० तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या असून राज्य सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी या चार दिवसांत १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि त्याच दिवसांपासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या सत्तेच्या दोन प्रमुख दावेदारांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरूच आहे. त्यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर व्हायचा असताना निवडणूक आचारसंहितेचा भंग करण्याचा ‘फॉर्म्युला’ मात्र जोरात सुरू असल्याचे गेल्या चार दिवसांत झालेल्या तक्रारींवरून दिसून येत आहे.
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर १५ ते १८ ऑक्टोबर या चार दिवसांत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी अवघ्या १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो.
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.