एमआयएमचा ‘वंचित’ला पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी काम कराः ओवैसींचे कार्यकर्त्यांना आदेश; नव्या समीकरणाची नांदी?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  अकोला लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा जाहीर केला आहे. अकोला मतदारसंघातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी काम करावे, असे निर्देश एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. एमआयएमने स्वतःहोऊन केलेल्या या घोषणेमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू होण्याची शक्यता आहे.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे एकमेव खासदार विजयी झाले होते. खा. जलील यांच्या विजयात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आंबेडकरी मतदारांचा मोठा वाटा होता. ते पुन्हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र यावेळी एमआयएमसोबत वंचित बहुजन आघाडी नाही.

वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अफसर खान यांच्या रुपाने स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम उमेदवारच रिंगणात उतरवल्यामुळे खा. जलील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर खा. ओवैसी यांना प्रकाश आंबेडकरांना पाठिंब्याची घोषणा करून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आंबेडकरी मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.

एमआयएमचे उमेदवार खा. इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी हे १४ एप्रिलपासूनच छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) तळ ठोकून बसले आहेत. आज मंगळवारी रात्री खा. जलील यांच्या प्रचारार्थ शहागंज भागात खा. ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांना पाठिंब्याची घोषणा केली.

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती खा. इम्तियाज जलील यांनी केली असे सांगत खा. जलील यांची विनंती मान्य केल्याचे खा. ओवैसी म्हणाले. प्रकाश आंबेडकर, दलित-वंचितांचे नेते आहेत. दलित-वंचितांचे नेतृत्व उभे राहिले पाहिजे आणि दलित-वंचितांचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे. त्यामुळे एमआयएम प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देत आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी काम करा, असे निर्देशही खा. ओवैसी यांनी एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. खा. ओवैसी यांच्या या घोषणेमुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू होणार आहे.

या पाठिंब्याचा अर्थ काय?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी युती करून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्याचा सर्वाधिक फायदा एमआयएमला झाला होता. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाले. दलित-मुस्लिम मतांचे एकत्रिकरण झाल्यामुळे आणि एकगठ्ठा आंबेडकरी मते इम्तियाज जलील यांच्या पारड्यात पडल्यामुळेच हा ऐतिहासिक विजय नोंदला गेला. यावेळच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम स्वतंत्रपणे लढत आहेत.

औरंगाबादेत वंचितने मुस्लिम उमेदवारच रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन आणि एक गठ्ठा आंबेडकरी मते वंचितच्या पारड्यात जाण्याची शक्यता असल्यामुळे एकट्याच्या बळावर आपला उमेदवार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, याची जाणीव एमआयएमला झाली आहे. त्यामुळे अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर करून एमआयएमने मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्याला प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद द्यावा आणि औरंगाबादेतील वंचितचा उमेदवार मागे घ्यावा, अशी त्यामागे एमआयएमची अपेक्षा दिसते. आता प्रकाश आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेतात? यावरच पुढचे चित्र अवलंबून राहणार आहे.

या पाठिंब्याचा फायदा किती?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तेव्हा एमआयएमशी युती असूनही त्यांना अकोला किंवा सोलापूर मतदारसंघात फारसा फायदा झाला नाही आणि या दोन्ही मतदारसंघात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे तब्बल २ लाख ५४ हजार ३७० मते खेचली होती तर प्रकाश आंबेडकर हे २ लाख ७५ हजार ५९६ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

त्याआधीच्या म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती नव्हती. तेव्हाही हिदायत पटेल हेच काँग्रेस उमेदवार होते. त्यांनी या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांपेक्षा जास्त मते घेतली होती. २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळवून हिदायत पटेल हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळवून प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसने हिदायत पटेल यांचा पत्ता कट करून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असले तरी त्यांना आरएसएसची पार्श्वभूमी आहे. तसा संदेश अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वदूर पसरवण्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यशस्वीही झाले आहेत. त्यामुळे यावेळी अकोला मतदारसंघातील मुस्लिम मते काँग्रेसच्या बाजूने जाण्याची शक्यता तशी कमीच आहे.

भाजपला मत द्यायचे नाही आणि काँग्रेसचा उमेदवारही ‘आपला’  नाही, अशी परिस्थिती अकोला लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांसमोर निर्माण झालेली असल्यामुळे त्यांच्यासमोर आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांचाच पर्याय उरलेला आहे. अशा परिस्थितीत एमआयएमने देऊ केलेल्या पाठिंब्यामुळे या मतांच्या टक्केवारीत थोडीफार वाढ होण्यास मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवी समीकरणे जुळणार का?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मात्र विभक्त झाले. एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत एक गठ्ठा आंबेडकरी मतांच्या जोरावर खासदार झालेले इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करा, असा निरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना दिल्यामुळे स्वाभिमान दुखावल्या गेला आणि या दोन पक्षांची ताटातूट झाली असे तेव्हा सांगितले गेले होते.

आता पाच वर्षांनंतर एमआयएमने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर करून मैत्रीचा हात पुढे केला आहे. प्राप्त परिस्थितीत औरंगाबादेत एमआयएमला जेवढी वंचितची गरज आहे, तितकीशी गरज अकोल्यात वंचितला राहिलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर ताटातूट झालेले हे दोन मित्र पक्ष पुन्हा एकत्र येतील का आणि महाराष्ट्राच्या राजकाणात नवीन समीकरणे पहायला मिळतील का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!